सोलापूर : माढा लोकसभा मतदारसंघातील (Madha Lok Sabha Constituency) माळशिरस (Malshiras) तालुक्यात मोहिते पाटील (Mohite Patil) आणि उत्तम जानकर (Uttam Jankar) यांनी शरद पवार (Sharad Pawar) गटात प्रवेश केल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) कामाला लागले असून बुधवारी रात्री पुण्यात तालुक्यातील सर्व पक्षीय मोहिते विरोधक नेत्यांची बैठक घेत त्यांना भाजपसोबत आणले आहे. या मोठ्या घडामोडीमुळे मोहिते पाटील आणि उत्तम जानकर यांना मोठा धक्का मनाला जात आहे. 


पंतप्रधान मोदींच्या सभेपूर्वी फडणवीसांची मोर्चेबांधणी


यापूर्वीच माळशिरस तालुक्यातील धनगर समाजाच्या अनेक नेत्यांनी मोहिते पाटील आणि उत्तम जानकर यांच्या सोबत न जाण्याचा निर्णय करीत भाजपाला पाठिंबा दिला होता. आता माळशिरस तालुक्यातील इतर पक्षीय नेत्यांनाही एकत्रित करीत त्यांनाही भाजपसोबत आणण्यात फडणवीस यांना मोठं यश मिळालं आहे. करमाळ्याचे आमदार संजयमामा शिंदे यांनी पुढाकार घेत हे सर्व नेत्यांना पुण्यात फडणवीस यांची भेट घालून दिली. यावेळी खासदार रणजित निंबाळकर देखील उपस्थित होते. माळशिरस तालुक्यातील एवढ्या मोठ्या संख्येने नेत्यांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतल्याने, उत्तम जानकर यांच्यामागे आता कोण उरले अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.


सर्वपक्षीय मोहिते विरोधक नेते भाजपसोबत 


बुधवारी रात्री माळशिरस तालुका विकास आघाडीसोबत फडणवीस यांनी ही बैठक घेतली. यावेळी लोणंद-फलटण-पंढरपूर रेल्वे संघर्ष समितीचे अध्यक्ष खंडकरी शेतकऱ्यांचे नेते एडवोकेट सोमनाथ अण्णा वाघमोडे, माळशिरस पंचायत समितीचे माजी उपसभापती किशोर भैय्या सुळ पाटील, युवा उद्योजक अमोलशेठ यादव, भाजपा किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष आणि माळशिरस तालुका संयोजन प्रमुख बाळासाहेब सरगर, महाराष्ट्र ऊस वाहतूकदार संघटना अध्यक्ष ज्येष्ठ विधीतज्ज्ञ ॲड .प्रशांतराव रुपनवर पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष अजित बोरकर, भाजपा युवा मोर्चाचे तालुका अध्यक्ष शिवराज पुकळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुका अध्यक्ष आणि माळशिरस नगरपंचायतीचे नगरसेवक सुरेशराव टेळे,  रयत क्रांती संघटनेचे राज्य प्रवक्ते राहुल बिडवे उपस्छिच होते.


फडणवीसांनी घेतली भेट


याशिवाय, माळशिरस तालुक्याच्या पश्चिम भागातील ज्येष्ठ नेते आणि मेडद गावचे माजी सरपंच पैलवान नाथाआबा लवटे पाटील, कनेर गावचे जनतेतील लोकनियुक्त सरपंच बाजीराव माने पाटील, खुडूस गावचे जनतेतील लोकनियुक्त सरपंच प्राध्यापक विनायक ठवरे पाटील सर, भांबुर्डी चे माजी सरपंच दादासाहेब वाघमोडे, कोथळे गावचे सरपंच अमोल माने, एकशिव गावचे माजी सरपंच गुणवंत पाटील, माळशिरस वकील संघटनेचे अध्यक्ष ॲड .विकास नारनवर, कारंडे ग्रामपंचायत सदस्य महेश थिटे,पैलवान नवनाथ काळे उद्योजक गोरखशेठ देशमुख दादासाहेब काळे, आर के खरात, मुकुंद काळे, विकास काळे, सचिन बोरकर, खंडू माने, स्वप्निलकुमार राऊत, रोनकभैय्या सुळ पाटील, सागर ठोंबरे, सचिन सरतापे, गणेश वाघमोडे, राजेंद्र सिद, पांडुरंग मगर, सागर खोमणे, साहिल चव्हाण, आप्पासो सुळ असे तालुक्यातील बहुतांश नेते आणि पदाधिकाऱ्यांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. 


मोहिते पाटीलांना रोखण्यासाठी फडणवीसांची व्यूहरचना


येत्या मंगळवारी म्हणजे 30 एप्रिल रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यासह अनेक मान्यवर नेते उपस्थित राहणार आहेत. मोहिते पाटील यांच्या बालेकिल्ल्यात गेल्या वेळी अकलूज येथे झालेल्या सभेपेक्षा मोठी सभा घेण्याचे महायुतीचे प्रयत्न असून माळशिरस तालुक्यातून जास्तीतजास्त पाठिंबा मिळविण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. याच तालुक्यात मोहिते पाटील यांना रोखण्याची व्यूहरचना फडणवीस करीत असून माळशिरस तालुक्यात मताधिक्य मिळविण्याची समीकरणे जुळविण्यासाठी ही बैठक घेण्यात आली होती. येत्या 30 एप्रिल रोजी अकलूज पेक्षा मोठी सभा घेण्यात भाजपाला यश आल्यास मात्र, मोहिते पाटील आणि जानकर यांना मोठा धक्का असू शकणार आहे. माळशिरस येथील शेती महामंडळाच्या 28 एकर जागेवर सकाळी अकरा वाजता या सभेचे आयोजन केले आहे .