Devendra Fadnavis : राज्यात वाळू माफियांविरोधात प्रशासन ॲक्शन मोडवर आल्याचे पाहायला मिळत आहे. जालना जिल्ह्यातील नऊ वाळू माफियांविरोधात पोलिसांनी तडीपारीची कारवाई केली आहे. या नऊ जणांना सहा महिन्यांसाठी बीड, जालना, छत्रपती संभाजीनगर आणि परभणी जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे. यात मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांचा मेहुणा विलास खेडकर याचाही समावेश आहे. पोलिसांनी तडीपारीची कारवाई केल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी संताप व्यक्त करत राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय. आता देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत पहिली प्रतिक्रिया दिली आहे. 


मनोज जरांगे यांच्या मेहुण्यासह 9 वाळू माफिया आणि अटल गुन्हेगारांवर तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे. अंबड उपविभागीय न्याय दंडाधिकारी यांच्या आदेशाने तडीपारीची कारवाई केली आहे. विलास हरिभाऊ खेडकर, केशव माधव वायभट, संयोग मधुकर सोळुंके, गजानन गणपत सोळुंके, अमोल केशव पंडित, गोरख बबनराव कुरणकर, संदीप सुखदेव लोहकरे, रामदास मसूरराव तौर, वामन मसुरराव तौर या नऊ जणांवर पोलिसांनी कारवाई केली आहे. 


काय म्हणाले देवेंद्र फडणवीस? 


मनोज जरांगेंच्या मेहुण्याला पोलिसांकडून तडीपारीची नोटीस बजावल्यानंतर त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय. तर तडीपारीच्या कारवाईबाबत देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी म्हटलंय की, कोणाचा साला आहे, कोणाला नातेवाईक आहे,  याच्यावर कारवाई होत नसते. जर काही गुन्हे केले असतील तर अटक होत असते. या प्रकरणाची माझ्याकडे माहिती नाही, योग्य ती माहिती घेऊन मी तुम्हाला सांगेन, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. 


मनोज जरांगेंची मुख्यमंत्र्यांवर टीका 


दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय. त्यांनी म्हटलंय की, एकीकडून सुरेश धस आणि देवेंद्र फडणवीस सांगतात की, आम्ही मराठा आंदोलकांच्या केसेस मागे घेणार आहोत आणि दुसरीकडे मराठा आंदोलकांना नोटीस दिल्या जात आहेत. तुमचा दुसरा काही विषय असेल तर आम्हाला देणं घेणं नाही, आपली भूमिका कायम आहे. आमच्या सरळ स्वभावाचा फायदा तुम्ही उचलायचा नाही. तुम्ही अंतरवालीतील आंदोलकांना जर नोटीस देणार असाल,  तुम्ही त्यांच्या पाठीमागे असे लागणार असेल तर फडणवीस साहेब मी सोडणार नाही. तुम्ही जर मराठ्यांना वेठीस धरायचं काम केलं तर, तुमचा कार्यक्रम लावायला मला वेळ लागणार नाही. देवेंद्र फडणवीसांनी चूक सुधारावी, त्यांनी दिलेल्या नोटीसा मागे घ्याव्यात. आम्ही देवेंद्र फडणवीसला सन्मानाची वागणूक द्यायला तयार आहोत. नाहीतर पुढच्या काळात सन्मान हा शब्द डोक्यातून काढून टाकायचा, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांना दिला. 


आणखी वाचा 


Manoj Jarange Patil : तुमच्या मुलीचं ऐकून सागर बंगला सोडत नाही, तुझं लेकरु बघतो तसं इतर लेकरांना बघ, जरांगेंचा मुख्यमंत्र्यांवर हल्ला