पुणे : आम्ही घर फोडत नाही आणि पक्षही फोडत नाही, फक्त संधी मिळाली तर ती सोडत नाही, असं म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे वक्तव्य केलं आहे. बारामती आम्ही 100 टक्के जिंकणार आहोत, असा पुर्नरुच्चार करत फडणवीसांनी पुन्हा एकदा विजयाचा विश्वास व्यक्त केला आहे.
विरोधकांकडे बोलण्यासाठी मुद्दे नाहीत
नरेटिव्हने निवडणूक जिंकता येत नाही. गद्दार, खुद्दार यावर निवडणूक जिंकता येत नाही. विरोधकांकडे बोलण्यासाठी मुद्दे नाहीत, आम्ही विकासावर बोलतो. आम्ही 45 जागा जिंकणार अशी घोषणा देणाऱ्यांना कुठल्या आम्ही तीन जागा सोडल्या ते विचारतो, पण बारामती आम्ही 100 टक्के जिंकणार आहोत. पहिल्या टप्प्यात नागपूर माझे हेड क्वार्टर होतं, दुसऱ्या टप्प्यात संभाजीनगर होतं, आता पुणे आहे, यानंतर मुंबई असणार आहे, असंही फडणवीसांनी म्हटलं आहे.
पुण्याची मेट्रो ही मोदींनी दिलेली सर्वात मोठी देणं
देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी म्हटलं आहे की, पुण्याच्या जागेकडे सर्वांचं लक्ष आहे. गावांबरोबर शहरांचा विकास झाला आहे. मोदी पंतप्रधान झाल्यानंतर पहिल्यांदा हा विचार मांडला. पुण्याची मेट्रो ही मोदींनी दिलेली सर्वात मोठी देणं आहे. शाश्वत शहर होण्याच्या दृष्टीने पुण्याची वाटचाल सुरू आहे. हा मोदींच्या दूरदृष्टीचा परिणाम आहे, असं म्हणत त्यांनी मोदींचं कौतुक केलं आहे.
उद्धव ठाकरे आणि पवार दोघेही डूबत्या नावेत
पंतप्रधान मोदींची शरद पवारांना ऑफर ही बातमी चुकीची आहे. ती ऑफर नाही, तर तो सल्ला आहे. शरद पवार बारामतीमध्ये हरणार आहेत. उद्धव ठाकरे आणि पवार दोघेही डूबत्या नावेत बसायला निघालेत, त्यांचे राजकीय मनसुबे पूर्णत्वाला न्यायचे असेल तर त्यापेक्षा आमच्यासोबत या हा सल्ला मोदींनी दिला असल्याचं स्पष्टीकरण फडणवीसांनी दिलं आहे.
उद्धव ठाकरेंना मानसोपचार तज्ज्ञांची गरज
उद्धव ठाकरेंना मी गांभीर्याने घेत नाही. उद्धव ठाकरे यांना आता मदतीची आवश्यकता आहे. त्यांना कुठल्यातरी मानसोपचार तज्ज्ञांची भेट घालून द्या, असा त्यांच्या जवळच्या लोकांना सल्ला आहे, असं म्हणत फडणवीसांनी ठाकरेंना लक्ष केलं आहे.
आम्ही घर आणि पक्ष फोडत नाही
आम्ही घर फोडत नाही आणि पक्षही फोडत नाही, फक्त संधी मिळाली तर ती सोडत नाही. जे सोबत येवू इच्छितात त्यांना सोबत घेतो, असं म्हणत फडणवीसांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार निशाणा साधला आहे.
मला तुरुंगात टाकण्याचा संपूर्ण कट रचला
मला आणि गिरीश महाजनांना तुरुंगात टाकण्याचा संपूर्ण कट रचला गेला होता. एका पोलीस आयुक्तांना ते काम देण्यात आल होतं. त्याचे मी व्हिडीओ सहित पुरावे दिले होते. अरविंद केजरीवाल अंतरिम जामिनावर बाहेर आले. बाहेर आले म्हणून त्यांचं स्वागत सत्कार होत आहेत. त्यांनी असं काय चांगलं काम केलं? असा सवाल यावेळी फडणवीसांनी उपस्थित केला आहे.
पाहा व्हिडीओ : गिरीश महाजन आणि मला अटक करण्याचा प्रयत्न
महत्त्वाच्या इतर बातम्या :
मशिदीत स्क्रीन लावून कुणाला मतदान करा सांगतायत, असं पहिल्यांदाचा घडतंय; देवेंद्र फडणवीसांची टीका