अहमदनगर : लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Election) महाराष्ट्रात तीन टप्प्यात मतदान पूर्ण झाले आहे. मतदानाचा चौथा टप्पा 13 मे रोजी असून आज प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत. लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत अवकाळी पाऊस महाराष्ट्रात धुमाकूळ घालत आहे. आज महाराष्ट्राच्या अनेक भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली. अहमदनगर लोकसभा मतदारसंघाचे (Ahmednagar Lok Sabha Constituency) भाजपचे उमेदवार सुजय विखे पाटील (Sujay Vikhe Patil) यांच्याही सभेत पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला. 


सुजय विखेंची सभा सुरु असतानाच अवकाळी पावसाने (Unseasonal Rain) जोरदार हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसाने सभा स्थळावरील मंडप कोसळला. यावेळी कार्यकर्त्यांनी थेट खुर्च्या आपल्या डोक्यावर घेत जोरदार घोषणाबाजी केली. त्यानंतर सुजय विखेंनी तुफान भाषण देखील केले. यामुळे प्रचाराच्या अखेरच्या दिवशी सुजय विखेंनी सभा गाजवल्याचे दिसून आहे. सुजय विखेंच्या सभेची आता जोरदार चर्चा रंगली आहे. 


भर पावसात सुजय विखेंनी सभा गाजवली 


भाषणात सुजय विखे म्हणाले की,  आज इथे इतका जोरात पाऊस होत आहे. तरी सुद्धा आमचा एकही कार्यकर्ता डगमगला नाही. अहमदनगर जिल्ह्याला गेली 50 वर्ष विखे पाटील कुटुंबाने सुसंस्कृत राजकारण दिले आहे. या जिल्ह्यात जो कोणी उमेदवार भाषणाच्या माध्यमातून पोलिसांचा अपमान करत असेल, जर कोणी उमेदवार आपल्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून माता-भगिनींचे डोके फोडत असेल, जो कोणी उमेदवार भर सभेत शिवीगाळ करत असेल, अशा माणसाला गाडायचे की नाही? असे म्हणताच कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत गाडणारच असे म्हटले.  


अहमदनगरमध्ये हाय व्होल्टेज लढत 


दरम्यान, अहमदनगर लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून भाजपचे उमेदवार सुजय विखे पाटील आणि महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार निलेश लंके (Nilesh Lanke) यांच्यात लढत होणार आहे. सुजय विखे यांच्या प्रचारासाठी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi) सभा घेतली. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी देखील सुजय विखेंच्या प्रचारार्थ सभा घेतल्या आहेत. तर दुसरीकडे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar), बारामती लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार सुप्रिया सुळे (Supriya Sule), शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांच्यासह महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांनी निलेश लंके यांच्यासाठी अहमदनगरमध्य्हे सभा घेतल्या आहेत. आज प्रचाराच्या तोफा थंडावणार असून या निलेश लंके विरुद्ध सुजय विखे या लढतीत कोण बाजी मारणार? याकडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.