बीड : लोकसभा निवडणुकीचा चौथा टप्पा पुढील काही तासांत सुरू होत असून प्रचाराच्या तोफा थंडावल्या आहेत. मात्र, मराठा समाजाची (Maratha) तोफ म्हणून ज्यांचा उल्लेख केला जातो, त्या मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांनी पुन्हा एकदा गंभीर आरोप केला आहे. यापूर्वी जरांगे यांनी पत्रकार परिषदेतून गंभीर आरोप केले होते. मला सलाईनमधून विष देऊन ठार मारण्याचा प्रयत्न होत असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. आता, माझ्या कुटुंबावरती हल्ला करण्याचा डाव रचला जातोय. सरकारला माझी निष्ठा विकत घेता येत नाही, म्हणून असा डाव चाललाय, अशी मला खबर मिळाल्याचे जरांगे यांनी म्हटलंय. जरांगे यांनी जालन्यातून संवाद साधताना हा गंभीर आरोप केला आहे. यावेळी, त्यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांना (Devendra Fadanvis) लक्ष्य केलं. तर, बीडमधील जातीय राजकारणावरही परखडपणे भाष्य केलं.


भावनिक करुन मला मागे सरकवण्याचा काम होत आहे. माझ्या बलिदानाने गृहमंत्र्यांचे समाधान होत असेल तर मी बलिदान द्यायला आणि जेलमध्ये जायला देखील तयार आहे, असे म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर जरागेंनी हल्लाबोल केला. राज्यात प्रत्येक जिल्ह्यात मराठ्यांची निवडणुकीमध्ये भीती आहे, ती नसती तर बारामती वरुन अंतरवालीमध्ये हेलिकॉप्टर आलं नसतं, असे म्हणत मनोज जरांगे यांनी जय पवार यांच्या भेटीवर भाष्य केलं. कारण,बारामतीमधील निवडणुकांपूर्वीच जय पवार यांनी अंतरवालीत जाऊन मनोज जरांगे यांची भेट घेतली होती. या भेटीचे फोटो व व्हिडिओही सर्वत्र व्हायरल झाले होते. 


सहकार्य करायचं का नाही ही समाजाची भूमिका.


मराठ्यांचा विरोध किंवा ओबीसी मराठा वाद असता तर मुंडे साहेबांना एवढ्या मतांनी निवडून दिलेच नसतं. त्यांच्या मुलीला दोनदा खासदार आणि पुतण्याला आमदार केलं नसतं. तसेच त्यांच्या मुलीला म्हणजे पंकजा मुंडेंना आणि केशर काकू क्षीरसागर यांना आमदार केलं नसतं, असे म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी बीडचा राजकीय इतिहास सांगितला. तसेच, मुंडे कुटुंबीयांना पिढ्यानपिढ्या निवडून देण्यात येत असल्याचंही त्यांनी निदर्शनास आणून दिलं. 


मराठा समाज जातीवादी असतात तर गोपीनाथ मुंडे उपमुख्यमंत्री झाले नसते, मनोहर जोशी मुख्यमंत्री झाले नसते, सुशीलकुमार शिंदे, नाईकसाहेब मुख्यमंत्री झाले नसते, देवेंद्र फडणवीस देखील मुख्यमंत्री झाले नसते. पण, मराठ्यांनी गादीवर बसवलं, त्याच मराठ्यांच्या लेकरांवर तुम्ही एसआयटी लावू लागला, त्यांच्यावरती गुन्हे दाखल करू लागलात, असे म्हणत पुन्हा एकदा मनोज जरांगेंनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांवर हल्लाबोल केला आहे. 


बीडमध्ये ओबीसीच निवडून येणार


मुंडे बहीण भावाला मराठ्यांनी मोठे केलं. मात्र, एवढं करून मराठा ओबीसी वाद असल्याचे बोलत आहेत, एका क्लिपवर तुम्हीच बोललात. पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांना आम्ही विरोधक कधीच मानलं नाही, मराठ्यांचा विरोध असल्याचं काही कारण नाही. बजरंग सोनवणे किंवा पंकजा मुंडे दोन्हीपैकी कोणालाही मतदान केल तरी ओबीसीचाच उमेदवार निवडून येणार आहे, असे म्हणत मनोज जरांगे यांनी राजकीय भूमिका स्पष्ट केली. 


मी कुठल्याच पक्षासोबत नाही


मी महाविकास आघाडी किंवा महायुती किंवा अपक्षा बरोबर नाही, मराठ्यांनी ज्याला पाडायचे त्याला पाडा. मात्र, त्याच्या पाच पिडया पुन्हा उभ्या राहिल्या नाही पाहिजे, असेही जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.