Attack on Arvind Kejriwal's House: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या घरावर हल्ला झाल्याची बातमी समोर आली आहे. संरक्षक कठडे तोडून तोडून हा हल्ला करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. यावरच दिल्लीचे उपमुख्यमंत्री आणि आपचे नेते मनीष सिसोदिया यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला आहे.


सिसोदिया म्हणाले, भाजपला पोलिसांना सोबत घेऊन मुख्यमंत्री केजरीवाल यांची हत्या करायची आहे. पोलिसांच्या उपस्थितीत भाजपच्या गुंडांनी अरविंद केजरीवाल यांच्या घरी पोहोचून तेथील सीसीटीव्ही कॅमेरे, संरक्षक कठडे तोडले. अरविंद केजरीवाल यांच्यावर विचारपूर्वक कट रचून हल्ला करण्यात आला आहे. भाजप अरविंद केजरीवाल यांना मारून संपवण्याचा प्रयत्न करत आहे, असा गंभीर आरोप सिसोदिया यांनी केला आहे.






सिसोदिया पुढे म्हणाले, पोलिसांनी मुद्दाम गुंडांना ताब्यात घेतले. हे सर्व पंजाबमधील पराभवामुळे करण्यात आले आहे. भाजपला निवडणुकीत केजरीवालांचा पराभव करता आला नाही, म्हणून त्यांना मारण्याचा प्रयत्न केला गेला. हे राजकारण नाही तर, त्यांचा केजरीवाल यांना मारायला कट होता.


या प्रकरणी पोलीस काय म्हणाले?


डीसीपी उत्तर सागर सिंह कलसी यांनी सांगितले की, ''सकाळी 11.30 वाजता भाजप युवा मोर्च्याच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाबाहेर (आयपी कॉलेजजवळील लिंक रोड) धरणे आंदोलन सुरू केले. त्यात दीडशे ते दोनशे लोक होते. द कश्मीर फाईल्स या चित्रपटाबाबत मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत दिलेल्या वक्तव्यावरून हे आंदोलन करण्यात आले. यानंतर एकच्या सुमारास काही आंदोलक दोन बॅरिकेड्स तोडून मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाबाहेर पोहोचले आणि तेथे त्यांनी गोंधळ घालत घोषणाबाजी केली. यानंतर या लोकांनी सीसीटीव्ही कॅमेरा आणि बूम बॅरिअरही तोडले.''