Majha Maharashtra Majha Vision 2024 :  2004 मध्ये  राष्ट्रवादी काँग्रेसला (NCP) सर्वाधिक जागा मिळालेल्या. त्यावेळी अजित पवार (Ajit Pawar) हे मुख्यमंत्री झाले नसते. त्याऐवजी दोन नेत्यांना संधी मिळाली असती असे वक्तव्य अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते प्रफुल पटेल (Praful Patel) यांनी केले. एबीपी माझाच्या 'माझा व्हिजन'मध्ये (Majha Vision 2024) प्रफुल पटेल यांनी राजकीय मुद्यांवर भाष्य केले. 


2004 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसहा राज्यातील मोठा पक्ष ठरला होता. त्यावेळी राष्ट्रवादीला मुख्यमंत्रीपद मिळाले असते असा मुद्दा अजित पवार गटांकडून  उपस्थित केला जातो. माझा व्हिजनमध्ये  अजित पवार मुख्यमंत्री होणार का, असा प्रश्न प्रफुल पटेल यांना विचारण्यात आला. त्यावर बोलताना प्रफुल पटेल यांनी सविस्तर उत्तर दिले. पटेल यांनी म्हटले की, जोपर्यंत  अशा घोषणा दिल्या जात नाहीत, तोपर्यंत कार्यकर्ता सक्रिय होत नाही. त्यामुळे आमच्या सर्वोच्च नेत्याला मोठे पद मिळावे अशी महत्त्वकांक्षा निर्माण होत नाही, तोपर्यंत कार्यकर्ते सक्रिय होणार नसल्याचे पटेल यांनी म्हटले. 


त्यावेळी अजित पवारांना मुख्यमंत्रीपदाची संधी नव्हती


प्रफुल पटेल यांनी सांगितले की, मुख्यमंत्रीपद मिळणे हे देखील नशिबाचा एक भाग आहे. 2004 मध्ये आमचे 71 आमदार निवडून आले होते. त्यावेळी आम्हाला मुख्यमंत्रीपदाची संधी होती. त्यावेळी आम्ही ते पद घेतले नाही. त्यावेळी सुरू असलेल्या चर्चांमध्ये मी होतो. त्यामुळे 2004 मध्ये आम्हाला मुख्यमंत्री पद मिळाले असते तरी अजित पवार मुख्यमंत्री झाले नसते. आरआर पाटील अथवा छगन भुजबळ यांना मुख्यमंत्रीपदाची संधी मिळाली असती असेही  पटेल यांनी सांगितले. 


तो निर्णय फक्त आमच्या तिघांमध्येच... 


प्रफुल पटेल यांनी म्हटले की, 2014 विधानसभा निवडणूक निकालानंतर आम्ही भाजपला प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष पाठिंबा देण्याची घोषणा केली. त्यानंतर भाजपजवळ गेलो. त्यानंतर राजकीयदृष्ट्या जवळ-लांब जात राहिलो. शरद पवारांबद्दल वैयक्तिक टीका नाही, रोष नाही. मात्र, आमची राजकीय भूमिका वेगळी आहे.शरद पवारांसोबत राजकीय भूमिका घेण्याबाबत मतभेद झाले. 2019 मध्ये भाजपसोबत चर्चा झाली होती, असा दावा पटेल यांनी केला.  


राष्ट्रपती राजवट अशीच लागत नसते. त्यावेळी मोठ्या पक्षांसह इतरांनीदेखील सत्ता स्थापन करण्यास नकार दिला. एक महिन्याच्या राष्ट्रपती शासनकाळाची कोंडी फोडण्यासाठी  शपथविधी झाला असल्याचे त्यांनी म्हटले. 2019 मधील भाजपसोबतच्या शपथविधी बाबतच्या निर्णयाबाबत अजित पवार, शरद पवार आणि मी अशा आम्हा तीन लोकांमध्ये चर्चा झाली होती. त्यावेळी इतरांना कल्पना नव्हती. आमच्याच ही बाब ठेवली असल्याचा गौप्यस्फोटही पटेल यांनी केला.  


'माझा महाराष्ट्र माझं व्हिजन' हा कार्यक्रम आज दिवसभर एबीपी माझावर पाहता येणार आहे. एबीपी माझाच्या अधिकृत यू-ट्यूब चॅनल, फेसबुक पेज, ट्विटर हॅण्डलवर प्रेक्षकांना हा कार्यक्रम लाईव्ह पाहता येणार आहे