ठाणे : राज्यात गेल्या आठवडाभरापासून शैक्षणिक अभ्यासक्रमात मनृस्मृतीचा सहभाग होण्यावरुन राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. विशेष म्हणजे यासंदर्भात केंद्रीयमंत्री रामदास आठवले  (Ramdas Athwale) यांनीही शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांना फोन करुन चर्चा केली. त्यानंतर मंत्री केसरकर यांनी, मनुस्मृतीच्या शैक्षणिक अभ्यासक्रमात सहभाग करण्याचा कुठलाही विषय नसल्याचे स्पष्ट केले. मात्र, अद्यापही याप्रकरणावरुन राजकारण होत आहे. आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Ahwad) यांनी मनुस्मृती प्रकरणावरुन थेट महाडमधील ऐतिहासिक चवदाळ तळ्यावर जाऊन आंदोलन केले. त्यावेळी, मनुस्मृती फाडताना डॉ. बाबासाहेब यांचा फोटो फाडला गेल्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे पदाधिकारी आक्रमक झाले आहेत. त्यानंतर, आव्हाड यांनीही घडलेल्या घटनेवरुन स्पष्टीकरण दिलं आहे. तसेच, मनुस्मृतीवर तुमचं काय म्हणणं आहे, असा सवालही आव्हाड यांनी विचारला.  


जितेंद्र आव्हाड यांनी महाड तळ्यावर जाऊन पाणी प्यायले. त्यानंतर, तेथे भाषण करताना काही लोकं महाराष्ट्राला बदनाम करत असल्याचं त्यांनी म्हटलं. अनेक समाज बांधवांनी एकत्र येऊन त्यावेळेस मनोस्मृतीला विरोध केला आहे. विश्वाची उत्पत्ती झाल्यापासून झोपा काढणे, क्रोध, द्वेष निंदा या गोष्टी मनोनी स्त्रियांना दिलेल्या आहेत.  1927 च्या मनोवादी आंदोलनात लढा देणाऱ्या इतर जातीतील लोकांच्या घरावर दहा वर्षे बहिष्कार टाकण्यात आला. मनुला आई वडील होते की नाही, असे म्हणत आव्हाड यांनी यावेळी मनुस्मृतीतील श्लोकांचे वाचनही केले. तसेच,काही निवडक लोकं महाराष्ट्राला बदनाम करत आहेत. एकीकडे संविधान बदलण्याचे कारनामे सुरू आहेत असे म्हणत त्यांनी भाजपा नेत्यांना लक्ष्य केलं. 


आनंद परांजपेंनी आव्हाडांचा फोटो फाडला


राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मनुस्मृतीच्या विरोधात महाड येथील चवदार तळ्यावर जाऊन आंदोलन केले. या आंदोलनादरम्यान जितेंद्र आव्हाड यांच्याकडून बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो फाडण्यात आल्याचा आरोप करत ठाण्यातील राष्ट्रवादी अजित पवार गट आक्रमक झाला असून जितेंद्र आव्हाड यांची प्रतिमा फाडत आनंद परांजपे यांनी महाड येथे झालेल्या घटनेचा निषेध नोंदवला. तसेच, जितेंद्र आव्हाड हे नाटक करत आहेत, प्रसिद्धीसाठी नौटंकी करत आहेत, अशी टीकाही परांजपे यांनी यावेळी केली. तर, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनीही जितेंद्र आव्हाड यांना इशारा दिला आहे. बाबासाहेबांच्या बुटावर नाक घासून माफी मागा, अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन करू, असा इशाराच अमोल मिटकरींनी दिला आहे. 


अन्यथा राज्यभर आंदोलन छेडणार


महाडमध्ये 'मनुस्मृती'चं दहन करतांना स्टंटबाजीच्या नादात जितेंद्र आव्हाडांनी डॉ. बाबासाहेबांची प्रतिमा फाडल्यावरून राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींनी इशाराच दिला आहे. डॉ. बाबासाहेबांची प्रतिमा फाडून त्यांनी राष्ट्राचा अवमान केला आहे, त्यामुळे आव्हाडांवर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करा, अशी मागणीही मिटकरी यांनी केली. तसेच, आव्हाडांनी महाड येथेच बाबासाहेबांच्या बुटावर नाक घासून माफी मागितली नाही, तर राज्यभरात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही आमदार मिटकरींनी दिला आहे. 


चवदार तळ्यावरील आंदोलन भूमिकेवर महाड पोलिस ॲक्शन मोडवर आल्याचं दिसून आलं. राज्य सरकारने नवीन अभ्यासक्रमांत लागू केलेले श्लोक हे पुन्हा मनुस्मृती निर्माण करणारे आहेत, त्यामुळे विद्यमान सरकार या अशा अभ्यासक्रमांचा वापर करुन पुन्हा मनुस्मृती जन्माला घालण्याचा प्रयत्न करीत असल्याचा दावा करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड आक्रमक झाले आहेत. त्यातूनच, आज महाड येथील ऐतिहासिक चवदार तळ्यावर मनुस्मृती जाळुन आंदोलन करण्यासाठी आव्हाड महाडला गेले होते. मात्र, महाड पोलिसांकडून त्यांना हे आंदोलनं रोखण्यासाठी नोटीस बजावण्यात आली. कायदा आणि सुव्यव्यवस्था अबाधित राहावी आचारसंहितेचा भंग होऊ नये यासाठी महाड पोलिसांनी आमदार जितेंद्र आव्हाडांच्या आंदोलनाविरुद्ध पाऊल उचललं. त्यामुळे, कोणती करवाई करणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिले आहे. 



जितेंद्र आव्हाड यांचं स्पष्टीकरण


मनुस्मृती दहन करण्याकरिता आम्ही महाड येथे आलो, तेव्हा मनुस्मृती लिहिलेलं पुस्तक फाडत असताना, त्यात बाबासाहेबांचा फोटो होता हे अनावधानाने लक्षातच आलं नाही. त्यामुळे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पोस्टर अनावधानाने फाडले गेले, यामागे आमचा कोणताही दुसरा हेतू यात नव्हता. मात्र, कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी माफी मागतो, पण आम्ही हे मुद्दामुन केलं नाही. आमच्या विरोधकांना काय राजकारण करायचं आहे, ते करतील ते खूप काही मागणी करतील.  पण, त्यावर मी अधिक काही बोलणार नाही, कोणाच्या भावना दुखवल्या असतील तर माफी मागतो, असे स्पष्टीकरण जितेंद्र आव्हाड यांनी घडलेल्या घटनेवर दिलं आहे. 


अमोल मिटकरी यांनी केलेल्या आरोपावरही आव्हाड यांनी प्रत्त्युत्तर दिलं. माझा स्टंट आहे की नाही ते जाऊ द्या. पण, मनुच्या पुस्तकावर मिटकरी यांचं काय म्हणणं आहे ते त्यांनी सांगावं, असे आवाहनही जितेंद्र आव्हाड यांनी केल.