नागपूर : महाविकास आघाडीच्या (Maha Vikas Aghadi) अधिकृत उमेदवार रश्मी बर्वे (Rashmi Barve) यांना मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसने (Congress) उमेदवारी जाहीर केल्यानंतर त्या संपूर्ण रामटेक (Ratek) मतदारसंघात जोमात प्रचार करत असताना दुसरीकडे त्यांचे जात वैधता प्रमाणपत्र रद्द (Rashmi Barve Caste Certificate Validity ) करण्यात आले आहे.  जात वैधता पडताळणी समितीने हा निर्णय घेतला आहे.


काँग्रेस, मविआसमोर मोठी अडचण


ऐन निवडणुकीच्या हंगामात हा निर्णय समोर आल्याने आता बर्वे यांच्यासह काँग्रेस आणि महाविकास आघाडीची मोठी अडचण झाली आहे. जात वैधता प्रमाणपत्रावर घेतलेल्या आक्षेपवर बर्वे यांनी कायदेशीर लढाई लढण्याचा निश्चय केला होता. मात्र आता जात पडताळणी समितीने घेतलेल्या निर्णयानंतर पुढे काय करावे? असा सर्वांनाच प्रश्न पडला आहे.    


सामाजिक न्याय विभागाचा आदेश


रश्मी बर्वे या काँग्रेसच्या रामटेक या मतदारसंघाच्या अधिकृत उमेदवार आहेत. बर्वे यांच्या उमेदवारीची घोषणा झाल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी एकच जल्लोष केला होता. मात्र ही उमेदवारी जाहीर झाल्यापासून त्यांच्या जात वैधता प्रमाणपत्राचाही मुद्दा समोर आला. जात वैधता प्रमाणपत्र मिळवताना कायदेशीर प्रक्रिया पार पडण्यात आलेली नाही, असा दावा करण्यात आला होता. सुनिल साळवे नावाच्या व्यक्तीने याबाबतची तक्रार दिली होती. प्राप्त तक्रारीनंतर सामाजिक न्याय विभागाने जात पडताळणी समितीला योग्य ती कारवाई करण्याचा आदेश दिला होता. 


जात पडताळणी समितीची नोटीस 


सामाजिक न्याय विभागाच्या आदेशानंतर जात पडताळणी समितीने बर्वे यांना नोटीस जारी केली होती. याच नोटिशीला बर्वे यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. केवळी राजकीय सुडभावनेतून माझ्यावर अशा प्रकारचे आरोप करण्यात येत आहेत, असा दावा रश्मी बर्वे यांनी आपल्या याचिकेत केला होता. त्यानंतर आता बर्वे यांचे जात वैधता प्रमाणपत्र रद्द करण्याचा निर्णय पडताळणी समितीने दिला आहे. या एका निर्णयामुळे बर्वे यांच्यापुढे मोठा पेच निर्माण झाला आहे.


आता पुढे काय होणार? 


लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख 27 मार्च होती. त्यामुळे बर्वे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेला. हा अर्ज दाखल करताना त्यांनी रामटेकमध्ये मोठे शक्तीप्रदर्शन केले. मात्र अर्ज दाखल केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी जात वैधता पडताळणी समितीने बर्वे यांचे जात वैधता प्रमाणपत्र रद्द ठरवले आहे. त्यामुळे काँग्रेसपुढे मोठा पेच निर्माण झाला आहे. या निर्णयामुळे बर्वे यांचा उमेदवारी अर्ज रद्दबातल ठरण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास रामटेक या मतदारसंघातून महाविकास आघाडीचा उमेदवार बाद ठरू शकतो. दरम्यान, या सर्व शक्यता असल्या तरी लवकरच बर्वे यांच्या उमेदवारीबाबतचे चित्र स्पष्ट होईल. त्यामुळे आगामी काळात काय होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.