अमरावती : सत्ताधारी महायुतीने अमरावती (Amravati) मतदाहरसंघातून विद्यमान खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांना उमेदवारी दिली आहे. राणा या भाजपच्या (BJP) कमळ या चिन्हावरून निवडणूक लढवणार आहेत. दरम्यान, राणा यांना तिकीट मिळाले असले तरी त्यांची डोकेदुखी अद्याप कमी झालेली नाही. त्यांना तिकीट मिळाल्यामुळे एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेचे (Shivsena) नेते आनंदराव अडसूळ (Anandrao Adsul) नाराज आहेत. तसेच महायुतीचा भाग असलेल्या प्रहार (Prahar) या पक्षाचे नेते बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनीदेखील राणा यांना विरोध केला आहे. आम्ही अमरावती या जागेसाठी आमचा उमेदवार देणार आहोत. आम्ही राणा यांचा प्रचार करणार नाही, असे कडू यांनी जाहीर केले आहे. ते आज (28 मार्च) 'एबीपी माझा'शी बोलत होते.


बच्चू कडू काय म्हणाले?


उमेदवारी कोणाला द्यायची हा निर्णय भाजपचा आहे. माझ्यासह जनतेत रोष आहे. हा रोष निकालात दिसणार आहे. नवनीत राणा यांना उमेदवारी दिली हे, चांगलंच झालं आहे. अब मजा आऐगा. प्रहारची भूमिका कायम आहे. येथे प्रहारचे अस्तित्व आहे. आम्ही नियोजनबद्द लढू. आम्ही नवनीत राणा यांचा प्रचार करणार नाही. आमची स्वत:ची पानटपरी (स्वत:चा पक्ष) आहे. आमच्यावर कोणीही दबाव टाकू शकत नाही, असे बच्चू कडू म्हणाले.


 प्रभू रामचंद्राचं नाव घ्यायचं आणि...


आम्ही शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन नियोनबद्धपणे निवडणूक लढवू. आम्ही या जागेवर चांगला उमेदवार देऊ किंवा सक्षम उमेदवाराला पाठिंबा देऊ. सध्या आम्हाला कोणताही सक्षम उमेदवार वाटलेला नसून 4 तारखेपर्यंत त्याचा शोध घेऊ. सर्वांनी एकत्र येऊन झुंडशाही लोकशाहीचे पतन करणाऱ्या उमेदवारांना पाडण्याची जबाबदारी घ्यावी. नवनीत राणा यांचे पती रवी राणा हे भाजपच्या पालकमंत्र्यांना बालकमंत्री म्हणाले होते. मोदींच्या नावाने जी गुंडशाही सुरू आहे ती थांबली पाहिजे. प्रभू रामचंद्रचं नाव घ्यावं आणि बगलेत सुरी ठेवायची हे चालणार नाही, असेदेखील कडू ठामपणे म्हणाले.

एवढी लाचारी कोणी करू नये..


एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील नेते आनंदराव अडसूळ यांचे पुत्र अभिजित अडसूळ अमरावतीतून अपक्ष म्हणून उमेदवार भरण्याच्या तयारीत आहेत. यावरही कडू यांनी भाष्य केले. मला वाटतं सर्वांनी एकत्र येऊन लढलं पाहिजे. रवी राणा यांनी भाजपचं कार्यालय फोडलं. कार्यालयात घुसून राणा यांनी भाजपचे पोस्टर्स फाडले. आता ज्यांनी पक्षाचे कार्यालय फोडले, त्यांचाच झेंडा हातात घेऊन भाजपच्या कार्यकर्त्यांना राणा यांचा प्रचार करावा लागणार आहे. मला वाटतं एवढी लाचारी अन्य कोणत्याही पक्षावर येत नसेल. आम्ही बोललो तर त्यांना राग येतो, अशी खोचक टीकाही कडू यांनी भाजपवर केली.