Nagpur News : 'होय, आम्ही सुनील केदार आणि विजय वडेट्टीवार यांच्या गटाचे आहोत, म्हणून आमच्या विरोधात कारवाई करण्यात आली'. आम्ही सुनील केदार आणि विजय वडेट्टीवार यांना आपला नेता मानतो, म्हणून आम्हाला टार्गेट केले. महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस (Youth Congress) मधील ज्या 60 पदाधिकाऱ्यांना तडकाफडकीने पद मुक्त केले गेले, त्यांनी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत विरोधात बंडाचा झेंडाच उगारला नाही, तर युवक काँग्रेस मधील मध्यरा‍त्रीच्या कथित राजकारणासंदर्भात सूचक आरोप केले आहे.


त्यामुळे संघ मुख्यालयाचा घेराव घालण्यासाठी बोलावण्यात आलेल्या आंदोलनाच्या मुद्द्यावर महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस मधील वाद वेगळ्या चव्हाट्यावर येऊन, आता तो वाद युवक काँग्रेस वरून काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांपर्यंत पोहोचू लागला आहे. तर कुणाल राऊत यांनाच पदावरून दूर करावे. कुणाल राऊत निष्क्रिय आहेत. त्यांनी युवक काँग्रेसची संघटना वाढवण्यासाठी काहीच केलं नाही, असा गंभीर आरोप युवक काँग्रेसमधून पदमुक्त करण्यात आलेल्या पदाधिकाऱ्यांनी केले आहेत. 


युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष विरोधात बंडाचा झेंडा?


युवक काँग्रेसच्या या अत्यंत महत्त्वाच्या आंदोलनामध्ये दांडी मारल्यामुळे महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या 60 पदाधिकाऱ्यांना तडकाफडकीने पदमुक्त करण्यात आले आहे. महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस मधील सुमारे 60 पदाधिकाऱ्यांना तडकाफडकीने त्यांच्या जबाबदारी पासून कार्यमुक्त करण्यात आले आहे. दरम्यान पदमुक्त झालेल्या पदाधिकाऱ्यांनी या प्रकरणी आपले मत व्यक्त करत आपल्या गैरहजेरीबाबत स्पष्टीकरणही दिले आहे. 


गेले पाच ते सहा दिवस संघाविरोधात आंदोलनाची तयारी सुरू होती. मात्र स्वतः कुणाल राऊत थायलंडला असल्यामुळे हे आंदोलन वारंवार पुढे ढकलण्यात आलं. त्यामुळे आंदोलन नेमकं केव्हा आहे, या संदर्भात कन्फ्युजन निर्माण झाले आणि अनेक पदाधिकारी कालच्या आंदोलनात पोहोचले नाही, असे स्पष्टीकरणही पदमुक्त झालेल्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी दिले आहे. 


....म्हणून प्रदेशाध्यक्षाना पदावरून हाकलून लावण्यात यावं


कुणाल राऊत गेले तीन वर्ष अध्यक्ष आहे आणि ते कोणतीही पूर्वसूचना न देता अनेक वेळेला पदाधिकाऱ्यांवर मध्यरात्री कारवाई करतात आणि सकाळी अचानक जेव्हा त्यांना जाग येते, तेव्हा ते कारवाई मागे घेतात. गेले तीन वर्ष आम्ही अशीच मध्यरात्रीची कारवाई पाहत असल्याचे धक्कादायक आरोप ही काही पदाधिकाऱ्यांनी केले आहे.


वरिष्ठ नेत्यांपर्यंत वादाची ठिणगी?


मुळात कुणाल राऊत यांना रामटेक लोकसभा मतदारसंघाची निवडणूक लढवायची होती, त्या संदर्भात त्यांचा मॅरीट किंवा क्षमता नव्हती. मात्र तरीही ते सुनील केदार यांच्यावर दबाव आणू पाहत होते. रामटेकसाठीच्या कुणाल राऊत यांच्या दबावाच्या राजकारणामध्ये आम्ही त्यांना साथ दिली नाही, आम्ही केदार साहेबांना आपला हिरो मानतो. म्हणूनच आमच्यावर कारवाई करण्यात आल्याचा आरोपही काही पदाधिकाऱ्यांनी केला आहे. कुणाल राऊत यांनाच प्रदेशाध्यक्ष पदावरून हाकलून लावण्यात यावं, अशी मागणी ही या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.


त्यामुळे जरी युवक काँग्रेस मधील पदाधिकाऱ्यांना पदमुक्त करण्याच्या मुद्द्यावरून या विषयाची सुरुवात झाली असली, तरी याचा शेवट कदाचित काँग्रेस मधील वरिष्ठ नेत्यांच्या हेवेदाव्यांमध्ये होईल आणि तो नाना पटोले विरुद्ध वडेट्टीवार आणि सुनील केदार इथपर्यंत पोहोचेल अशीच शक्यता आहे.


हे ही वाचा