मनसेचे प्रमुख राज ठाकरे आणि भाजपचे नेते अमित शाह यांच्यात दिल्लीमध्ये बैठक पार पडली. या बैठकीत मनसे-भाजप युतीवर चर्चा झाली आहे. त्यामुळे कोणत्याही क्षणी या दोन्ही पक्षांत युतीची घोषण होऊ शकते. ही युती झाल्यास महाराष्ट्रातील राजकरण बदलू शकते. भाजप-मनसे एकत्र आल्यास विरोधी बाकावरील महाविकास आघाडीला वेगळे राजकीय डावपेच आखावे लागू शकतात. यावरच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिलीय. महराष्ट्रात महायुती कमजोर झाल्याचा दावा त्यांनी केलाय. 


"लवकरच सर्व उमेदवारांची नावे जाहीर केली जातील"


लोकसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. आज-उद्या महाविकास आघाडीतील जागावाटप जाहीर केले जाणार आहे. काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीची उद्या बैठक आहे. या बैठकीत सर्व नावांवर चर्चा होणार आहे. त्यामुळे लवकरच सर्व उमेदवारांची नावे जाहीर केली जातील, अशी माहिती नाना पटोले यांनी दिली.  


प्रकाश आंबेडकरांच्या पत्रावर पटोले काय म्हणाले?


वंचित बहुजन आघाडीचा अद्याप अधिकृतपणे महाविकास आघाडीत समावेश झालेला नाही. प्रकाश आंबेडकर यांनी १९ मार्च रोजी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना पत्र लिहित वंचित बहुजन आघाडी राज्यातील सात मतदारसंघांमध्ये काँग्रेसला (Congress) पूर्णपणे पाठिंबा देईल अशी भूमिका स्पष्ट केली आहे. यावरही पटोले यांनी प्रतिक्रिया दिलीय. आम्हाला पत्र मिळालं आहे. मल्लिकार्जुन खरगे प्रकाश आंबेडकर यांच्याशी बोलतील. मी त्यामध्ये बोलणार नाही, असे पटोले म्हणाले. 


राज्यात महायुती कमजोर- नाना पटोले 


मनसे आणि भाजपा यांच्यात युती होऊ शकते. यावरही नाना पटोलेंनी प्रतिक्रिया दिलीय. मनसे भाजपा यांच्यातील युतीची प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही. महाराष्ट्रात महायुती कमजोर झाली आहे, असा दावा पटोले यांनी केला.