मुंबई: मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी मंगळवारी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. या भेटीत मनसे आणि भाजप युतीबाबत चर्चा केली. यावेळी राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी अमित शाह (Amit Shah) यांच्यासमोर मनसेला लोकसभेसाठी दोन जागा द्याव्यात, असा प्रस्ताव मांडला. बंद दाराआड झालेल्या या चर्चेचा नेमका तपशील अद्याप बाहेर आला नसला तरी लोकसभा निवडणुकीत भाजप (BJP) आणि मनसे (MNS) एकत्र येणार, हे आता जवळपास स्पष्ट झाले आहे.
राज ठाकरे हे सोमवारी संध्याकाळी अमित ठाकरे यांना घेऊन अचानकपणे चार्टर्ड विमानाने दिल्लीच्या दिशेने रवाना झाले, तेव्हा अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला होता. देवेंद्र फडणवीस यांच्या निरोपानंतर राज ठाकरे दिल्लीकडे रवाना झाले असे सांगितले जात होते. मात्र, आता नव्याने समोर आलेल्या माहितीनुसार, अमित शाह आणि राज ठाकरे यांच्या या भेटीसाठी फार पूर्वीपासूनच हालचाली सुरु होत्या. सूत्रांच्या माहितीनुसार, देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांच्यात लोकसभेत युती करण्याच्यादृष्टीने मुंबईत तीनवेळा बैठक झाली होती. या भेटीदरम्यान राज ठाकरे यांनी अमित शाह यांना एकांतात भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती. ही बाब देवेंद्र फडणवीस यांनी अमित शाह यांच्या कानावर घातली होती. त्यानुसार राज ठाकरे यांना अमित शाह यांनी दिल्लीला बोलावून घेतले आणि ठरल्यानुसार या दोघांची 'वन टू वन' भेट झाली.
बाळा नांदगावकर यांना दक्षिण मुंबई की शिर्डीतून उमेदवारी?
राज ठाकरे आणि अमित शाह यांच्या भेटीत महाराष्ट्रात मनसेने लोकसभेच्या काही जागा लढवण्याबाबत चर्चा झाली. मनसेकडून भाजपकडे दक्षिण मुंबई, नाशिक आणि शिर्डी या लोकसभेच्या जागांसाठी प्रस्ताव मांडण्यात आल्याचे समजते. परंतु, भाजपची लोकसभेच्या जास्तीत जास्त जागा स्वत: लढवण्याची रणनीती पाहता मनसेसाठी फारतर एक जागा सोडली जाऊ शकते. यामध्ये दक्षिण मुंबई किंवा शिर्डी मतदारसंघाचा समावेश असू शकतो. अशावेळी मनसेकडून कोणता नेता रिंगणात उतरणार, ही चर्चा सुरु झाली आहे. सध्याच्या माहितीनुसार मनसेतून लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी बाळा नांदगावकर हे नाव आघाडीवर असल्याचे समजते. त्यामुळे आता येत्या काही दिवसांमध्ये महायुतीच्या उमेदवार यादीत मनसेच्या नेत्याचे नाव असणार का, हे आता पाहावे लागेल.
आणखी वाचा
मोठी बातमी : तिकडे राज ठाकरे शाहांच्या भेटीला, इकडे अजित पवार फडणवीसांच्या बंगल्यावर