नागपूर: महायुती सरकारने सध्या लावलेल्या योजनांच्या धडाक्यामुळे राज्याचा आर्थिक गाडा रुळावरुन घसरेल, याची जाणीव अर्थमंत्री अजित पवार यांना आहे. त्यामुळेच ते अर्थखात्याच्या कारभाराला शिस्त लावण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळेच आता महायुतीच्या नेत्यांकडून अजित पवार (Ajit Pawar) यांना साईडलाईन करण्याचे प्रयत्न सुरु झाले आहेत, असे वक्तव्य विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (vijay wadettiwar) यांनी केले. ते शुक्रवारी नागपूरमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते.


अजित पवार हे गुरुवारी राज्य मंत्रिमंडळाची बैठक 10 मिनिटांत सोडून बाहेर पडल्याची माहिती समोर आली आहे. याविषयी विजय वडेट्टीवार यांना विचारणा केली असता त्यांनी म्हटले की, महायुतीत वाद नेहमीचे आहे. प्रत्येक कॅबिनेटमध्ये वाद होतात. हे राज्याच्या हितासाठीचे वाद नाही, तर स्वतःच्या हितासाठीचे हे वाद आहेत. तिजोरीत पैसा नसताना सरकारने 80 निर्णय घेतले,  यांना कोणाची चिंता आहे? अनेक विभागांमध्ये सचिव नाहीत. कृषी विभागात सचिव नाही, मर्जीतले सचिव बसून राज्याची तिजोरी लुटत आहेत, असा आरोप विजय वडेट्टीवार यांनी केला.


महायुतीच्या नेत्यांनी अजित पवार यांनाही बाजूला सारण्याचे प्रयत्न सुरु केले असावेत.  अजित पवार अनेक वेळेला विविध खात्याचे मंत्री राहिले आहेत. त्यांनी अर्थ विभागात शिस्त निर्माण करण्याचे प्रयत्न केले. मात्र, सध्या शिस्त बिघडून सर्व काम सुरु आहे. पैसे नसताना जीआर काढले गेले. हे निर्णय टक्केवारी मोजण्यासाठी घेतले जात आहेत. अजितदादांनी कुठे जावं हा त्यांचा प्रश्न आहे. ज्या पद्धतीने त्यांची माणसे निघून जात आहे, त्यामुळे ते अस्वस्थ आहेत, महायुतीत तर भाजप नेते अजितदादा यांना साईडलाईन करण्या प्रयत्न करत आहेत, असे विजय वडेट्टीवार यांनी म्हटले. 


जागावाटपाबाबत विजय वडेट्टीवारांचे महत्त्वाचे भाष्य


विदर्भातील काही जागांसाठी शरद पवार गट आग्रही आहे. मविआच्या जागावाटपात शरद पवार गटाकडून या जागांची मागणी केली जात आहे. याबाबत बोलताना विजय वडेट्टीवार यांनी सांगितले की, विदर्भात काँग्रेसची ताकद आहे. काही जागांवर आम्ही दोन तीन चार वेळेला पराभूत झालो असलो तरी त्या ठिकाणी तिथे शरद पवार गटाची किती ताकद आहे हे पहावे लागेल. आम्ही तिथे हरलो म्हणून जागा सोडावी असं होत नाही. मेरीट प्रमाणे निर्णय होईल. जिथे काँग्रेसची ताकद आहे, तिथे काँग्रेसने लढावं. जेव्हा आम्ही हरलो तेव्हाची परिस्थिती वेगळी होती, असे विजय वडेट्टीवार यांनी सांगितले. जागावाटप जवळपास झाले आहे. आता 50 ते 55 जागांचा प्रश्न शिल्लक आहे. 14 तारखेच्या अखेरच्या बैठकीत निर्णय होईल, असेही वडेट्टीवार यांनी म्हटले. 


मविआतील मुख्यमंत्रीपदाच्या रस्सीखेचीवर विजय वडेट्टीवार म्हणाले...


विधानसभा निवडणुकीपूर्वी अनेक लोक पंजा आणि तुतारी हाती घेतील. पण अनेक लोक लाईनीत उभे आहेत. हरयाणामुळे हुरळून जाऊ नका. आम्हाला माहिती आहे महाराष्ट्रात काय होईल. तुम्ही कितीही प्रयत्न करा, मोदी-शहा येऊनही लोकसभेत काय झालं हे सर्वांना माहीत आहे. राहुल गांधी यांचा सल्ला बरोबर आहे. त्यामुळे कोणीही महत्त्वाकांक्षा बाळगू नये. सर्वांनी मिळून निर्णय घ्यायचा आहे. कोणी म्हणणार नाही, मी होणार, तो होणार. जो महायुतीचा पाप राज्य वर बसला आहे तो खाली उतरवायचा आहे, असेही वडेट्टीवार यांनी म्हटले.


क्रिमीलेअरची मर्यादा वाढवण्याच्या निर्णयावरुन वडेट्टीवारांची टीका


महायुती सरकारने गुरुवारच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत क्रीमिलेअरची मर्यादा 8 लाखावरुन 15 लाखांपर्यंत वाढवण्याच्या निर्णयावर टीका केली. क्रिमिलेअरची मर्यादा पंधरा लाख करणे ही शुद्ध धूळफेक आहे. हे निवडणूक डोळ्यांपुढे ठेवून केलेला काम आहे. आतापर्यंत बुद्धी भ्रष्ट झाली होती का, आतापर्यंत निर्णय का झाला नाही? ओबीसींची मत मिळवण्यासाठी हे निर्णय केले आहेत. ही फक्त राज्य सरकारची शिफारस आहे, केंद्र सरकार काय निर्णय घेते यावर बरच काही अवलंबून आहे, अशी टीका वडेट्टीवार यांनी केली. 



आणखी वाचा


धडाधड निर्णय, खटाखट योजनांची घोषणा; पण निवडणुकीपूर्वीच्या शेवटच्या मंत्रिमंडळ बैठकीतून अजित पवार 10 मिनिटांत उठून गेले