नाशिक :राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी आगामी विधानसभा निवडणुकीसंदर्भात मोठं वक्तव्य केलं आहे. आगामी विधानसभा निवडणूक मीच लढवणार आहे, अशी प्रतिक्रिया छगन भुजबळ यांनी एबीपी माझासोबत बोलताना दिली.  छगन भुजबळ यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राशी बोलताना आगामी विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी फार इच्छुक नसल्याचं म्हटलं होतं. 1985 पासून या क्षेत्रात आहे, आता नव्या पिढीनं ही जबाबदारी घ्यावी, असं छगन भुजबळ म्हणाले होते. आता मात्र, त्यांनी येवला विधानसभेची निवडणूक आपणच लढणार असल्याचं म्हणत या विषयावर पडदा टाकला आहे.  


आगामी येवला विधानसभा मीच लढणार असल्याची प्रतिक्रिया छगन भुजबळ यांनी एबीपी माझाला दिली.  माझ्या वाढत्या वयामुळे मुलांना केवळ त्यांचे निर्णय त्यांनी घ्यावेत फक्त शिव शाहू फुले आंबेडकर विचार सोडू नये, असा सल्ला दिल्याचं भुजबळ यांनी सांगितलं. सध्या येवला विधानसभा लढण्यासाठी पक्षाचा आणि कार्यकर्त्यांचा आग्रह आहे, त्यामुळे येवला विधानसभा लढावीच लागणार असल्याचं. छगन भुजबळ म्हणाले. 


स्वत: चे निर्णय घ्यायला शिका, छगन भुजबळ यांचा सल्ला


आता तुम्ही मोठे झाला आहात, आई - वडिलांना मात्र तुम्ही लहानच असतात पण स्वतःचे निर्णय घ्यायला शिका असा भावनिक आणि वडिलकीचा सल्ला मंत्री छगन भुजबळ यांनी पुतण्या समीर आणि मुलगा पंकज यांना नांदवळ येथील कार्यक्रमात दिला होता. गल्ली ते दिल्लीपर्यंत आपण कामाच्या माध्यमातून पोहोचलेलो आहे. जनतेची सेवा करा, समाजकारण करा व त्यातून राजकारण करा जनता नेहमी तुमच्या पाठीशी राहील असंही मंत्री छगन भुजबळ म्हणाले.  नांदगावच्या कार्यक्रमात समीर भुजबळ यांना नांदगाव,नाशिक, मुंबई आणि महाराष्ट्राची जनता तुमची वाट पाहतेय असं त्यांनी म्हटलं होतं. समीर भुजबळ आता फ्रंटफुटवर येत आहेत, त्यांना आशीर्वाद द्यावा असं आवाहन छगन भुजबळ यांनी केलं होतं. 


दरम्यान, छगन भुजबळ हे सध्या एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात अन्न व नागरी पुरवठा मंत्री आहेत. मधल्या एका वर्षाचा काळ सोडला तर त्यापूर्वी ते उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात देखील मंत्री होते.  येवला मतदारसंघात छगन भुजबळ यांच्या विरोधात कोण उमेदवार असणार हे स्पष्ट झालेलं नाही. 


इतर बातम्या : 


Chhagan Bhujbal : समीर भुजबळ आता हळूहळू फ्रंटफुटवर येत आहेत त्यांना आशीर्वाद द्या, छगन भुजबळ यांचं नांदगावकरांना आवाहन