पंढरपूर: काँग्रेस पक्षाच्या सोलापूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवार प्रणिती शिंदे यांना गुरुवारी पंढरपूर येथे कथित मराठा आंदोलकांच्या रोषाचा सामना करावा लागला. येथील सरकोली गावाजवळ कथित मराठा आंदोलकांनी प्रणिती शिंदे (Praniti Shinde) यांची गाडी घेरली. त्यांना गावात शिरण्यापासून मज्जाव केला. बराचवेळ उलटून आंदोलकांचा घोळका प्रणिती शिंदे यांच्या गाडीची वाट सोडायला तयार नव्हता. यादरम्यान काही आंदोलकांनी त्यांच्या गाडीवर हाताने जोरात फटके मारले. त्यामुळे प्रणिती शिंदे यांच्या संतापाचा पारा चढला आणि त्या थेट गाडीतून उतरुन जमावाला सामोऱ्या गेल्या. यावेळी प्रणिती शिंदे यांनी आक्रमक जमावासमोर बिलकूल न डगमगता 'अरे ला कारे' केले.
प्रणिती शिंदे यांची गाडी सरकोली गावाजवळ आली तेव्हा आंदोलकांनी त्यांच्या गाडीला घेराव घातला. तुम्ही आमच्या गावात कशासाठी आलात? तुम्ही मराठा आरक्षणाला पाठिंबा दिल्याची क्लीप दाखवा. आम्हाला गाडी फोडायला लावू नका, अशी आक्रमक भाषा जमावातील काहीजणांकडून वापरली जात होती. या जमावाकडून प्रणिती शिंदे यांना जाब विचारला जात होता. दरम्यानच्या काळात काहीजणांनी आक्रमक होत प्रणिती शिंदे यांच्या गाडीवर फटके मारायला सुरुवात केली. त्यावेळी प्रणिती शिंदे मागचा पुढचा विचार न करता गाडीतून खाली उतरल्या. त्यांनी गाडीवर फटके मारणाऱ्यांन चढ्या आवाजातच उत्तर दिले. माझ्या गाडीला हात लावायचा नाय, असे त्यांनी आक्रमक जमावाला खडसावून सांगितले. त्यानंतरही जमाव शांत होण्याचे नाव घेत नव्हता. परंतु, प्रणिती शिंदे शेवटपर्यंत या जमावासमोर न डगमगता उभ्या राहिल्या.
मराठा आंदोलकांमध्ये घुसून भाजप कार्यकर्त्यांनी माझ्या गाडीवर हल्ला केला: प्रणिती शिंदे
या सगळ्या प्रकारानंतर प्रणिती शिंदे यांनी भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्यांवर गंभीर आरोप केले. मराठा आंदोलकांमध्ये घुसून भाजपच्या कार्यकर्त्यांनी माझ्या गाडीवर हल्ला केला. यासंदर्भात पोलीस तक्रार करायची की नाही, याबाबत मी निर्णय घेईन. छत्रपती शिवाजी महाराज आणि मनोज जरांगे पाटील यांनी ही शिकवण दिलेली नाही. त्यामुळे मराठा आंदोलक असे करणार नाहीत, असे प्रणिती शिंदे यांनी म्हटले.
प्रणिती शिंदे यांना सोलापूरमधून लोकसभेची उमेदवारी
काँग्रेस पक्षाने सोलापूर लोकसभा मतदारसंघातून आमदार प्रणिती शिंदे यांना उमेदवारी जाहीर केली. "मी पक्षाचे आभार मानते. ही लोकशाहीसाठीची लढाई आहे", अशी प्रतिक्रिया उमेदवारी जाहीर झाल्यानंतर प्रणिती शिंदे यांनी दिली.
आणखी वाचा
काँग्रेसचे महाराष्ट्रातील 7 उमेदवार जाहीर, सोलापुरातून प्रणिती शिंदे रिंगणात