बीड: मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरण आणि खंडणी प्रकरणामुळे सध्या बीड जिल्हा प्रचंड चर्चेत आहे. भाजप आमदार सुरेश धस यांच्याकडून वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांच्यावर दररोज नवे गंभीर आरोप केले जात आहे. धनंजय मुंडे यांच्या राजकीय आशीवार्दाने वाल्मिक कराड याने बीड जिल्ह्यातील गुन्हेगारीला कशाप्रकारे खतपाणी घातले, याबाबत विरोधकांकडून टीकेची झोड उठवली जात आहे. संतोष देशमुख हत्याप्रकरणातील एक आरोपी वगळता उर्वरित मारेकऱ्यांना पोलिसांनी अटक केली आहे. या मारेकऱ्यांच्या गुन्हेगारी रेकॉर्डच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून चर्चेचा विषय ठरत आहेत. अशातच आता बीडमध्ये वाल्मिक कराड यांचा राईट हँड म्हणून चर्चेत असणाऱ्या गोट्या गित्ते याच्याविषयी सोशल मीडियावर अचानक प्रचंड चर्चा सुरु झाली आहे.
शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सोशल मीडियावर एका पोस्टचा दाखला देत गोट्या गित्ते आणि वाल्मिक कराडबाबत एक सनसनाटी दावा केला आहे. गोट्या गित्ते यानेच वाल्मिक कराडच्या सांगण्यावरुन बापू आंधळेला गोळी मारली, असा दावा आव्हाड यांनी केला आहे. त्यासोबत जितेंद्र आव्हाड यांची गोट्या गित्ते याच्या कृष्णकृत्यांचा पाढा वाचणारी सोशल मीडियावरील एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये गोट्या गित्ते हा बीड जिल्ह्यात सर्रासपणे पिस्तुल विकायचा, असा दावा करण्यात आला आहे. बीडमध्ये प्रत्येकाच्या कमरेला बंदूक असायचे श्रेय गोट्या गित्ते याचे. हा माणूस गेली १० वर्ष पुणे आणि महाराष्ट्रात बंदुका विकत आहे. पूर्ण हाय एन्ड पिस्तूल विकतोय, हा एका आठवड्यात जामिनावर बाहेर येतो, असे या पोस्टमध्ये म्हटले आहे.
गोट्या गित्ते सोशल मीडियावर अचानक चर्चेत का आला?
सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येनंतर राज्यभरात खळबळ माजली होती. देशमुख यांना प्रचंड छळ करुन मारण्यात आले होते. यामुळे सुदर्शन घुले, विष्णू चाटे, सुधीर सांगळे, कृष्णा आंधळे या मारेकऱ्यांची प्रचंड चर्चा होती. या सगळ्यांनी लोखंडी रॉड, फायटर, कत्ती अशा हत्यारांनी संतोष देशमुख यांना ठार मारले होते. या आरोपींच्या क्रूरपणाची चर्चा सर्वतोमुखी झाली होती. अशातच गेल्या तीन दिवसांपासून अचानक गोट्या गित्ते हे नाव बीड जिल्ह्यात आणि सोशल मिडीयावर अचानक चर्चेत आले. यासाठी एक व्हिडीओ कारण ठरला आहे.
हा व्हिडीओ वाल्मिक कराड याला पुण्याहून बीडच्या केज येथे नेतानाचा असल्याचे सांगितले जात आहे. यावेळी पोलिसांच्या गाड्यांच्या ताफ्यासोबत गोट्या गित्ते याची गाडीही असल्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. गोट्या गित्ते हा सराईत गुन्हेगार असल्याचे सांगितले जाते. मग त्याची गाडी पोलिसांच्या ताफ्यासोबत का होती, याबाबतही सोशल मीडियावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
आणखी वाचा