Ghulam Nabi Azad Resigns : काँग्रेसचे (Congress) ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद (Ghulam Nabi Azad) यांनी आज (26 ऑगस्ट) पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वासह सर्व पदांचा राजीनामा दिला. याआधी गुलाम नबी आझाद यांचा जम्मू-काश्मीर काँग्रेसच्या प्रचार समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा हा चर्चेचा विषय बनला होता. हे पद मिळाल्यानंतर काही तासांतच त्यांनी प्रकृतीचे कारण सांगून राजीनामा दिला होता. त्यानंतर आता त्यांनी काँग्रेसला रामराम केला आहे. गुलाम नबी आझाद यांच्यापूर्वी ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी काँग्रेसचा राजीनामा दिला होता. सध्या ते समाजवादी पक्षाकडून राज्यसभेचे खासदार आहेत.


गुलाम नबी आझाद यांच्या राजीनाम्यामुळे पक्षातील अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. कारण पक्षातील महत्त्वाच्या नियुक्त्या करताना त्यांचा सल्ला घेण्यात येत असे तसंच ते पक्षात सक्रिय होते. काही दिवसांपूर्वी नॅशनल हेराल्ड वृत्तपत्र प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांना चौकशीसाठी बोलावलं होतं. त्यावेळी केलेल्या आंदोलनात आझाद सहभाही होते. शिवाय त्यांनी पत्रकार परिषदेलाही संबोधित केलं होतं.


गुलाम नबी आझाद यांचं सोनिया गांधींना पाच पानांचं राजीनामा पत्र
आझाद यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना पाच पानांचं राजीनामा पत्र पाठवलं आहे. सोनिया गांधींना पाठवलेल्या राजीनाम्याच्या पत्रात गुलाम नबी आझाद यांनी लिहिलं आहे की, "अत्यंत खेदाने आणि अत्यंत भावूक अंत:करणाने मी भारतीय राष्ट्रीय काँग्रेससोबतचे माझं 50 वर्षांचं नातं तोडण्याचा निर्णय घेतला आहे." तसंच भारत जोडो यात्रेऐवजी काँग्रेस जोडो यात्रा काढावी, असा सल्लाही गुलाम नबी आझाद यांनी दिला आहे.


राहुल गांधी यांच्यावर हल्लाबोल 
आपल्या राजीनामा पत्रात गुलाम नबी आझाद यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या जोरदार निशाणा साधला आहे. त्यांनी लिहिलं आहे की, "तुमच्या नेतृत्वाखाली पक्ष चांगली कामगिरी करत आहे. पण दुर्दैवाने राहुल गांधी यांचा पक्षप्रवेश झाल्यापासून, विशेषत: 2013 नंतर तुम्ही राहुल यांची उपाध्यक्षपदी नियुक्ती केल्यानंतर, त्यांनी पक्षातील चर्चेची संपूर्ण ब्लू प्रिंटच उद्ध्वस्त करुन टाकली आहे. सर्व ज्येष्ठ आणि अनुभवी नेत्यांना बाजूला करण्यात आलं. तर अननुभवी नेते पक्षाचा कारभार पाहू लागले."


गुलाम नबी आझाद यांनी आपल्या राजीनामा पत्रात लिहिलं आहे की, "2014 मध्ये तुम्ही आणि त्यानंतर राहुल गांधी यांनी पक्षाचं नेतृत्व स्वीकारल्यानंतर  काँग्रेसचा दोन लोकसभा निवडणुकीत मानहानिकारक पराभव झाला. 2014 ते 2022 या कालावधीत झालेल्या 49 पैकी 39 विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा पराभव झाला. पक्षाला केवळ चार राज्यांच्या निवडणुका जिंकता आल्या आणि सहा राज्यांमध्ये युती करण्यात यश आलं. दुर्दैवाने, आज फक्त दोन राज्यात काँग्रेसचं सरकार आहे आणि इतर दोन राज्यांमधील आघाडीतील त्यांचा वाटा अत्यंत किरकोळ आहे."


आझाद यांची नाराजी
गुलाम नबी आझाद बराच काळ काँग्रेसवर नाराज होते. काँग्रेसच्या नाराज नेत्यांच्या G-23 गटातही त्यांचा सहभाग होता. G-23 गट सातत्याने काँग्रेसमध्ये अनेक बदलांची मागणी करत आहे. प्रचार समितीचे अध्यक्ष बनल्यानंतर काही तासांतच गुलाम नबी आझाद यांनी पदाचा राजीनामा दिल्याने त्यांची नाराजी समोर आली होती. जम्मू-काश्मीरमध्ये काँग्रेसने आझाद यांच्या नेतृत्वाखाली विधानसभा निवडणूक लढवावी, अशी सोनिया गांधी यांची इच्छा होती. त्यामुळेच त्यांना निवडणूक प्रचार समितीचे अध्यक्ष करण्यात आलं होतं. मात्र प्रकृतीचं कारण देत गुलाम नबी यांनी काही तासातच पदाचा राजीनामा दिला. तेव्हापासूनच राजकीय वर्तुळात त्यांच्याबद्दल अनेक तर्कवितर्क लावले जात होते.