MNS Survey For BMC Election 2022 : आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या (BMC Election 2022) पार्श्वभूमीवर राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (MNS) मतदारांची नाडी जाणून घेण्यासाठी आणि पक्षाला उमेदवारी देण्यास अनुकूल असलेले प्रभाग ओळखण्यासाठी स्वतंत्र एजन्सीद्वारे सर्वेक्षण सुरु केलं आहे. मनसेने सर्वेक्षणाचे काम खासगी एजन्सीकडे सोपवलं आहे. ही एजन्सी मनसेसाठी मुंबईतील 100 प्रभागांचं सर्वेक्षण करत आहे. मनसेच्या स्थापनेनंतर पक्षाने सर्वेक्षणाचे काम खासगी एजन्सीकडे सोपवण्याची ही पहिलीच वेळ आहे. मनसेच्या सूत्रांच्या माहितीनुसार, या सर्वेक्षणासाठी पुण्यातील एका संस्थेची नियुक्ती करण्यात आली आहे.


खासगी एजन्सीमार्फस सर्वेक्षण सुरु असल्याने अहवालामध्ये कोणताही पक्षपात होणार नाही. सर्वेक्षणाच्या अहवालामुळे पक्षाला जिंकण्याची अधिक चांगली संधी असलेले क्षेत्र किंवा प्रभाग ओळखण्यास मदत होईल. तसंच पक्षाव्यतिरिक्त, उमेदवारांनाही या निवडणूकपूर्व सर्वेक्षणातून मतदारांची नाडी कळेल, असं मनसेच्या नेत्याचं म्हणणं आहे.


ही सर्वेक्षण संस्था तीन टप्प्यात आपला अहवाल पक्षाला सादर करेल. प्रभागातील स्थानिक राजकीय परिस्थिती, मतदारांची भूमिका, प्रभागाच्या विकासाचे मॉडेल अशा काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर सर्वेक्षण केल्यानंतर एजन्सी त्याचा अहवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना सादर करेल. तसंच युती करुन निवडणूक लढवल्यास काय फायदा होऊ शकतो, याचाही अहवाल सर्वेक्षण संस्था पक्षाला सादर करणार आहे.


पक्ष स्थापनेनंतर दमदार कामगिरी पण....
राज ठाकरे यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केल्यानंतर 9 मार्च 2006 रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली. त्यानंतर 2007 मध्ये मुंबई महापालिका निवडणुकीत 28 जागा जिंकल्या. तर पक्षाची अप्रतिम कामगिरी आणि राज ठाकरेंच्या करिष्मामुळे मनसेने 2009 मध्ये लढवलेल्या 143 विधानसभेच्या 13 जागांवर विजय मिळवला. एकट्या मुंबईत मनसेचे सहा आमदार निवडून आले.


पण, नंतर पक्षाला उतरती कळा लागली. पक्ष एवढा कमकुवत झाला की 2014 च्या विधानसभा निवडणुकीत मनसेला फक्त एक जागा मिळाली. 2017 च्या मुंबई महापालिका निवडणुकीत मनसेला फक्त सात जागांवरच विजय मिळवता आला. तर दुसरीकडे प्रवीण दरेकर आणि राम कदम यांसारख्या अनेक दिग्गजांनी मनसे सोडली. 2017 मध्ये निवडून आलेल्या सात नगरसेवकांपैकी सहा नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे यावेळी मनसे कोणताही धोका घेण्याच्या मनस्थितीत नसल्याचे सूत्रांनी सांगितलं. कोणाला उमेदवारी द्यायची हा निर्णय घेण्यापूर्वी, राज ठाकरे यांनी रेकी करण्यासाठी आणि महापालिका निवडणुकीपूर्वी मनसेसाठी परिस्थिती कशी आहे, हे जाणून घेण्यासाठी एक खाजगी संस्था नियुक्त केली आहे.


'इच्छुक उमेदवारांना समान संधी मिळेल'
"या निर्णयामुळे पक्षाच्या तिकीटावर लढू इच्छिणाऱ्यांना समान संधी मिळेल. अनेक वेळा, स्थानिक नेतृत्व पक्षाच्या उच्चपदस्थांना उमेदवारांची शिफारस करतात. काही वेळा पक्षपातीपणे शिफारशी केल्या जातात ज्यामुळे पक्षाच्या सच्च्या कार्यकर्त्यांना संधी मिळत नाही. परंतु आता एजन्सीच्या अहवालानंतर सत्य परिस्थिती समोर येऊन योग्य उमेदवाराला संधी मिळेल," असा विश्वास मनसेचे इच्छुक उमेदवाराने व्यक्त केला.