मुंबई: राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीच्यादृष्टीने सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये शह आणि काटशहाचे राजकारण सुरु झाले असताना मुंबईतून एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. मुंबादेवी विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेस आमदार अमीन पटेल (Amin Patel) हे सोमवारी सकाळी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या सागर निवासस्थानी गणपतीच्या दर्शनाला पोहोचले. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले होते. लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसचे मिलिंद देवरा, बाबा सिद्दीकी आणि संजय निरुपम हे नेते महायुतीमध्ये सामील झाले होते. त्यामुळे अमीन पटेल हे देवेंद्र फडणवीस यांच्या घरी पोहोचताच विधानसभेपूर्वी तेदेखील काँग्रेस पक्षाला अलविदा करणार का, अशी चर्चा रंगू लागली होती.


या सगळ्या चर्चेनंतर अमीन पटेल यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यांनी म्हटले की, मी देवेंद्र फडणवीस यांच्या घरी दोन कारणांसाठी गेलो होतो. एक म्हणजे मी त्यांच्या घरातील गणपतीचे दर्शन घेतले. दुसरे म्हणजे 18 तारखेला ईद-ए-मिलादू नबी आहे, गणपती विसर्जनाच्या दुसऱ्या दिवशी जे जुलूस काढण्यात येणार आहेत, त्याची परवानगी लोकांना हवी आहे. त्याबाबत पोलिसांकडून सहकार्य मिळावे, ही मागणी मी देवेंद्र फडणवीसांकडे केल्याचे अमीन पटेल यांनी सांगितले.


अमीन पटेल-फडणवीसांच्या भेटीवर चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...


अमीन पटेल आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीबाबत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली. त्यांनी म्हटले की, देवेंद्र फडणवीस फक्त गणपती दर्शनासाठी अमिन पटेल यांच्या घरी गेले होते. यात नवीन आणि राजकारणासारखे काही नाही. काल शरद पवार साहेब हे अमरीश पटेल यांच्या प्रायव्हेट हेलिपॅडला उतरले. ही तर महाराष्ट्राची संस्कृती आहे. अतिथी आला की पुष्पगुच्छ द्यावा लागतो. मात्र, काल अमरीश पटेल हे हाती तुतारी धरणार, अशा बातम्या चालवण्यात आल्या. त्या योग्य नाहीत, असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.


शरद पवार भाजपच्या संकटमोचकाला घेरणार?


राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची शिवस्वराज्य यात्रा 21 तारखेला जळगाव जिल्ह्यात दाखल होणार आहे. यावेळी भाजपचे जळगाव जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष दिलीप खोडपे हे शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. दिलीप खोडपे हे गिरीश महाजन यांच्याविरोधात जामनेर विधानसभा लढवणार असल्याचे समजते. त्यामुळे शरद पवार यांनी भाजपच्या संकटमोचकाला घेरण्याची तयारी सुरु केल्याची चर्चा आहे.


आणखी वाचा


जयंत पाटलांच्या भेटीसाठी गोकुळला मीच पाठवलं, नरहरी झिरवाळांचा मोठा गौप्यस्फोट


शरद पवार मोठा डाव टाकण्याच्या तयारीत, संकटमोचक गिरीश महाजनांविरोधात भाजपच्या मात्तबर नेत्याला तिकीट?