नाशिक : गेल्या काही दिवसांपासून विधासभा उपाध्यक्ष आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते नरहरी झिरवाळ (Narhari Zirwal) यांचे चिरंजीव गोकुळ झिरवाळ (Gokul Zirwal) चर्चेत आले आहेत. कारण राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांच्या नाशिकमध्ये (Nashik News) झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यास गोकुळ झिरवाळ यांनी हजेरी लावली होती. यामुळे गोकुळ झिरवाळ हे शरद पवार गटात (NCP Sharad Pawar Group) जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. आता जयंत पाटील आणि गोकुळ झिरवाळ भेटीवर खुद्द नरहरी झिरवाळ यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. 


लोकसभा निवडणुकीच्या यशानंतर राष्ट्रवादी शरद पवार गटात मोठं इनकमिंग सुरु आहे. राज्यभरातून अनेक नेते शरद पवारांच्या राष्ट्रवादीत पक्ष प्रवेश करत आहेत. काही दिवसांपूर्वी गोकुळ झिरवाळ यांनी जयंत पाटील यांची भेट घेतली होती. तसेच  माझी छाती फाडली तर शरद पवार दिसतील, संधी मिळाली तर वडिलांविरोधात लढणार, असे भाष्यही गोकुळ झिरवाळ यांनी केले होते. यानंतर गोकुळ झिरवाळ हे शरद पवार गटात प्रवेश करणार का? अशा चर्चा दिंडोरी विधानसभा मतदारसंघात रंगल्या होत्या. 


जयंत पाटलांच्या भेटीसाठी गोकुळला मीच पाठवले 


आता नरहरी झिरवाळ यांनी गोकुळ झिरवाळ आणि जयंत पाटील यांच्या भेटीवर मोठा गौप्यस्फोट केला आहे. जयंत पाटील आणि गोकुळ झिरवाळ यांच्या भेटीमागील सत्य नरहरी झिरवळ यांनी आज सांगितले आहे. जयंत पाटील यांच्या भेटीसाठी गोकुळला मीच पाठवले होते. जयंत पाटील माझा नेता आहे त्यांचा जाऊन सत्कार कर, अशा सूचना गोकुळला दिल्या होत्या. तिथे त्याला विचारले बापासारखे त्याच्यात काही गुण आहेत. म्हणून त्याने निवडणूक लढविण्याचे सांगितले होते. त्यामुळे संभ्रम तयार झाला, पण आता तो जागेवर आहे आणि कायमस्वरूपी जागेवर राहणार आहे, असे नरहरी झिरवाळ यांनी म्हटले आहे.


नरहरी झिरवाळ धनराज महालेंची भेट घेणार 


तर, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी काही दिवसांपूर्वी नरहरी झिरवाळ यांची दिंडोरी विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी घोषित केली. दिंडोरीचे शिंदे गटाचे नेते आणि माजी आमदार धनराज महाले यांनी नाराजी व्यक्त केली. कारण धनराज महाले विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. याबाबत नरहरी झिरवाळ यांना विचारले असता ते म्हणाले की, मी धनराज महाले यांची भेट घेणार आहे. निवडून येण्यासाठी उभे राहणार असाल तर ठीक. मात्र, अपक्ष लढून मला अडचणीत आणण्यासाठी निवडणूक लढविणार असाल तर निवडणूक लढवू नका, अशी विनंती त्यांना करणार असल्याची माहिती नरहरी झिरवाळ यांनी दिली आहे. 


आणखी वाचा


धनगर-धनगड जीआर काढण्याच्या निर्णयाला विधानसभा उपाध्यक्षांचा विरोध, म्हणाले, आदिवासींमधून आरक्षण देण्याचा अट्टाहास का?