नागपूरः महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी 156 जागा आहेत. मात्र इच्छुकांची संख्या पंधराशेच्या घरात असल्याने कोणाला उमेदवारी द्यायची, असा पेच कॉंग्रेसला पडला आहे. महानगरपालिकेची निवडणूक केव्हाही जाहीर होण्याच शक्यता आहे. सध्या कॉंग्रेससमोर कोणाला उमेदवारी द्यायची असा प्रश्न आहे. गटबाजीमुळे मागील निवडणुकीत मोठ्या पराभवाला कॉंग्रेसला सामोरे जावे लागले होते. त्यानंतरही कॉंग्रेसमधील अंतर्गत भांडणे अद्याप संपलेली नाहीत. ठाकरे आणि राऊत गटाची तोंडे अद्यापही विरुद्ध दिशेलाच आहेत.
राज्यात सत्ता आल्यानंतर भांडणे कमी होती आणि कॉंग्रेसला चांगले दिवस येतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र कुरघोडी आणि आपआपल्या समर्थकांनाच सर्व काही देण्याच्या नेत्यांच्या अट्टाहासामुळे परिस्थिती आणखीच बिघडली आहे. एक व्यक्ती एक पदाच्या निर्णयामुळे विकास ठाकरे यानी राजीनामा दिला होता. मात्र पुन्हा त्यांनाच अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळण्याचे पत्र कॉंग्रेसने दिले आहे. त्यामुळे पक्षांतर्गत विरोधक आणखीच नाराज झाले आहेत. मध्यंतरी प्रदेश प्रतिनीधींच्या नियुक्तीवरुनही असंतोष उफाळून आला होता. या पार्श्वभूमीवर शहर कॉंग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत शहाध्यक्ष आमदार विकास ठाकरे यांनी उमेदवारी वाटपावर तोडगा काढला. त्याकरिता आपणच आपल्या प्रभागातील उमेदवार एकमताने ठरवावा अशी सूचना त्यांनी केली. आगामी निवडणुकीत 15 जणांते मंडळ करावे. एक बुथ अध्यक्ष व 15 बुथचा एक वार्ड तयार करावा.
NMC Elections : अंतिम मतदार यादीत 22 लाख 33 हजार 866 मतदार
शहरातील निरीक्षक म्हणून येणाऱ्या पदाधिकाऱ्यांसमोर वार्ड अध्यक्षाची निवड करावी. येत्या काही दिवसामध्ये डिजिटल मेंबरशिप करण्यात आली होती. 18 ब्लॉकवर 18 बी.आर.ओ यांनी कार्य केले. त्यानुसार काही नवीन ब्लॉक अध्यक्ष व शहर कार्यकारिणीचे पदाधिकारी नव्याने संघटनेत दिसतील. लवकरच बीआरओ प्रदेश कॉंग्रेसला प्रस्ताव सादर करतील. प्रदेश कॉंग्रेस कमेटीकडून नवीन कार्यकारिणी घोषित होईल, असे विकास ठाकरे यांनी सांगितले.