नागपूरः महापालिकेच्या प्रभागाची अंतिम मतदार यादी गुरुवारी प्रसिद्ध करण्यात आली. विविध प्रभागातून आलेले 519 आक्षेप निकाली काढत प्रारुप मतदार यादीत दुरुस्ती करण्यात आल्यानंतर सायंकाळी दहाही झोन कार्यालयांत 52 प्रभागाची अंतिम मतदार यादी उपलब्ध करून देण्यात आली आहे. तक्रारींची मोठी संख्या असल्याने निवडणूक आयोगाने अंतिम मतदार यादी प्रसिद्धीसाठी दोनदा मुदतवाढ दिली होती. गुरुवारी प्रकाशित झालेल्या मतदार यादीत 22 लाख 33 हजार 866 मतदार आहेत.


महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभागनिहाय अंतिम मतदार यादीची अनेक दिवसांपासून प्रतीक्षा होती. निवडणूक आयोगाने सुरुवातीला 9 जुलैला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्याचा निर्णय घेतला होता. त्यांतर 16 जुलैपर्यंत मुदतवाढ दिली. त्यानंतर 21 जुलै अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्याचा दिवस ठरविला. त्यामुळे अनेकांमध्ये प्रभागनिहाय अंतिम मतदार यादीबाबत उत्सुकता होती. अखेर महापालिकेने गुरूवारी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करीत इच्छुक, माजी नगरसेवकांना दिलासा दिला. त्यामुळे आता निवडणुकीसाठी इच्छुक व माजी नगरसेवकांना प्रभागातील मतदारांचा अभ्यास करून पुढील डावपेच आखता येणार आहे. शहरात महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादीवर 519 नागरिकांनी आक्षेप नोंदविला होता. यात सर्वाधिक 117 आक्षेप आशीनगर झोनमध्ये तर सर्वात कमी 21 आक्षेप धरमपेठ झोनमध्ये नोंदविण्यात आले होते. हे सर्व आक्षेप निकाली काढत महापालिकेने अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली.


संकेतस्थळावरही यादी उपलब्ध


महापालिकेने गुरुवारी अंतिम मतदार यादी झोन कार्यालयांमध्ये उपलब्ध करून दिली. परंतु 52 प्रभागांची मतदार यादी अपलोड करण्याकरिता विलंब लागणार असल्याने उद्या महापालिकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाणार असल्याचे मनपा निवडणूक अधिकारी व सहायक आयुक्त महेश धामेचा यांनी नमुद केले.


प्रभाग 51 मध्ये सर्वाधिक मतदार


अंतिम मतदार यादीत प्रभाग 51 मध्ये सर्वाधिक म्हणजेच 52611 मतदारांची नोंद आहे. तर 50 हजारांवर मतदार असलेले दुसरे प्रभाग क्रमांक 50 ठरले. तर प्रभाग क्रमांक 22 मध्ये 49084 मतदार आहेत.