नागपूरः उदयपूर येथे झालेल्या कॉंग्रेसच्या राष्ट्रस्तरीय चिंतन शिबिरात ठरलेला फॉर्म्युला विदर्भात लागू झाला आहे. यानुसार शिर्डी येथे महाराष्ट्राच्या शिबिरात ‘एक व्यक्ती एक पद’चा फॉर्म्यूला मांडण्यात आला. पाच वर्षांपेक्षा अधिक काळापासून नागपूर शहराध्यक्ष पदावर विराजमान असलेले कॉंग्रेसचे शहराध्यक्ष आमदार विकास ठाकरे यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. याच फॉर्म्यूल्यानुसार ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक यांनीही राजीनामा दिला.


राजीनामा दिल्याची घोषणा कॉंग्रेसचे महासचिव एच. के. पाटील आणि प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शिर्डीत केली. आमदार विकास ठाकरे यांनी राजीनामा दिल्यामुळे त्यांच्या समर्थकांमध्ये अस्वस्थता बघायला मिळत आहे. जयपूरमध्ये कॉंग्रेसच्या चिंतन शिबिरात ठरल्यानंतर महाराष्ट्रात सर्वप्रथम कार्याध्यक्ष नसीम खान यांनी प्रचार समितीच्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर इतर पदाधिकाऱ्यांनी राजीनामा सत्र सुरू केले. शीर्डी येथे सुरू असलेल्या दोन दिवसीय चिंतन शिबिरात आमदार विकास ठाकरे आणि राजेंद्र मुळक यांनी राजीनामा दिला आहे. आमदार ठाकरे यांनी जयपूरमध्ये ‘एक व्यक्ती एक पद’चा निर्णय झाल्यानंतर लगेच राजीनामा दिला होता. मात्र त्याची घोषणा आज शिर्डीच्या शिबिरात करण्यात आली. राजेंद्र मुळकसुद्धा पाच वर्षांपेक्षा जास्त काळापासून नागपूर जिल्हा ग्रामीणच्या जिल्हाध्यक्षपदी होते. त्यामुळे त्यांनीही तात्काळ आपल्या पदाचा राजीनीमा दिला. आता नागपूर शहर आणि जिल्ह्याला नवीन अध्यक्ष मिळण्याचा मार्ग सुकर झाला आहे.


शहराध्यक्षपदी गुडधे की पांडव?


या दोन्ही पदांसाठी राजकीय वर्तुळात विविध नावांची चर्चा जोरात आहे. या शर्यतीत कॉंग्रेसचे प्रफुल्ल गुडधे,गिरीश पांडव, अभिजित वंजारी यांच्या नावांची चर्चा आहे.


नवनियुक्तीवर गटबाजीचा प्रभाव?


नागपूर महानगरपालिकेची निवडणूक तोंडावर आली आहे. त्यामुळे शहर आणि ग्रामीणचे रिक्त झालेले अध्यक्षपद भरण्याची जबाबदारी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर येऊन पडली आहे. ते लवकरच हायकमांडसोबत चर्चा करून हा निर्णय घेणार असल्याचे सांगितले जात आहे. असे असले तरी नागपुरातील गटबाजीचा प्रभाव दोन्ही अध्यक्षांच्या निवडीवर होणार, असे सांगितले जात आहे. ही परिस्थिती प्रदेशाध्यक्ष नाना पटोले कशा प्रकारे हाताळतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.


कॉंग्रेसचे मिशन मनपा 2022!


कॉंग्रेसने मागील निवडणूक विकास ठाकरे यांच्या नेतृत्वात लढविली होती. त्यावेळी परिस्थिती वेगळी होती. पण यावेळी महानगरपालिकेवर सत्ता स्थापन करण्याचे मोठे आव्हान कॉंग्रेसपुढे आहे. राज्यातील चार प्रमुख राजकीय पक्षांपैकी राष्ट्रवादी आणि शिवसेना येथे फारशी प्रभावी नसल्यामुळे भाजप आणि कॉंग्रेसमध्ये थेट लढत होईल, यात शंका नाही आणि महापालिकेवर आपला झेंडा फडकवण्यासाठी नाना पटोले आतुर आहेत. त्यामुळे अध्यक्ष निवडीत त्यांना चोख भूमिका बजावावी लागणार आहे.


 


हेही वाचा


मनपाच्या आवज-जावकमधील तक्रारी पडूनच!


व्हिडीओ व्हायरल होताच, दोन कॉन्स्टेबलवर तातडीने कारवाई


वाघिणीच्या दातानेच घेतला नवजात बछड्याचा जीव; वन्यप्रेमींमध्ये हळहळ


Nagpur 24 hours helpline : पावसाळी इमर्जन्सी ; मनपाचे हेल्पलाईन क्रमांक सेव्ह करुन ठेवा