Opposition Meeting : विरोधकांच्या एकत्रित बैठकीवर पहिल्याच दिवशी काँग्रेस (Congress) विरुद्ध आप (AAP) संघर्षाचं सावट पाहायला मिळालं. निमित्त ठरलं दिल्ली सरकारबाबत केंद्र सरकारच्या एका अध्यादेशाचं. केंद्र सरकारच्या या अध्यादेशाला राज्यसभेत पराभूत करण्यासाठी केजरीवाल यांचे प्रयत्न चालू आहेत. सर्व पक्ष जाहीरपणे पाठिंबा देत आहेत फक्त काँग्रेस का पाठिंबा देत नाही हा सवाल कालच्या बैठकीत केजरीवाल यांनी उपस्थित केला. त्यावरुन काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि अरविंद केजरीवाल यांच्यात शाब्दिक चकमकही उडाल्याची सूत्रांची माहिती आहे.
कालच्या बैठकीत संयुक्त पत्रकार परिषदेला ही अरविंद केजरीवाल उपस्थित नव्हते. ही बैठक संपण्याच्या आधीच आपने एक अधिकृत पत्रक काढून काँग्रेसच्या भूमिकेचा निषेध केला. जोपर्यंत काँग्रेस या संदर्भात आपली भूमिका जाहीर करत नाही तोपर्यंत विरोधकांच्या बैठकीत उपस्थित राहणे आपल्यासाठी अवघड आहे असंही त्यात म्हटले आहे.
खरंतर काँग्रेसने पाठिंबा देऊन सुद्धा राज्यसभेत या विधेयकावर केंद्र सरकारचा पराभव होऊ शकत नाही. काठावरचे बहुमत असलं तरी बिजू जनता दल, वायएसआरसीपीसारखे पक्ष भाजपच्या मदतीला धावून येतात आणि त्यामुळे या मुद्द्यावरुन विरोधकांच्या बैठकीत केजरीवाल इतके आक्रमक का आहेत हा देखील प्रश्न राजकीय वर्तुळात विचारला जातोय.
विरोधकांच्या एकत्रित बैठकीला संघर्षाने सुरुवात
- सुप्रीम कोर्टाने दिल्लीतल्या पोस्टिंगबाबत दिल्ली सरकारचा अधिकार मान्य केला होता पण केंद्र सरकारच्या अध्यादेशाने तो पुन्हा हिरावून घेतला
- या अध्यादेशाला राज्यसभेत पराभूत करण्यासाठी अरविंद केजरीवाल गेले काही दिवस वेगवेगळ्या राज्यातल्या नेत्यांची भेट घेत आहेत.
- काल विरोधकांच्या एकत्रित बैठकीत त्यांची मागणी होती की आधी काँग्रेसने आपली भूमिका जाहीर करावी
- त्यावर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी अशा पद्धतीच्या भूमिका संसद अधिवेशनाच्या आधी ठरतात काँग्रेस पक्षामध्ये सगळे निर्णय विचार विनिमयाने होतात असं म्हटलं
- शिवाय दिल्लीमधल्या आम आदमी पक्षाच्या एका प्रवक्त्यांचं वक्तव्य देखील त्यांनी बैठकीत उपस्थित केलं त्यावरुन केजरीवाल आणि खरगे यांच्यात शाब्दिक चकमक ही उडाली
- दिल्ली आणि पंजाब या दोन्ही राज्यांमध्ये आप आणि काँग्रेस एकमेकांचे विरोधक आहेत पंजाबमध्ये तर काँग्रेसचीच सत्ता आपने हिसकावली आहे
- त्यामुळे जरी बैठकांमध्ये एकत्र असले तरी प्रत्यक्षात आम आदमी पक्ष आणि काँग्रेस एकत्र काम कसे करणार हा प्रश्न आहेच
दिल्ली पाठोपाठ पंजाब जिंकल्यानंतर आम आदमी पक्षाच्या राष्ट्रीय महत्त्वाकांक्षा वाढत चालल्या आहेत. गुजरात गोव्यात त्यांनी निवडणूक लढवली. जिथे काँग्रेस मजबूत आहे तिथे आपने जोर लावला की नुकसान काँग्रेसचं होताना दिसतं. या पार्श्वभूमीवर काँग्रेस आणि आप एकत्रित कशी वाटचाल करणार हा प्रश्न आहेच.
विरोधकांची पुढील बैठक 10 किंवा 12 जुलै रोजी शिमलामध्ये
विरोधकांची पुढची बैठक 10 किंवा 12 जुलै रोजी शिमलात होणार आहे. त्यावेळी जागावाटपावर राज्यनिहाय चर्चा आणि समान अजेंडा यावर मंथन करु असं कालच्या पत्रकार परिषदेत सांगितलं गेलं. पण जर आपसारखा पक्ष बाजूला झाला तर दिल्लीच्या 7 आणि पंजाबच्या 13 अशा किमान 20 जागांवर विरोधी एकीचा प्रश्न उभा राहतो.
'आप'ला नुकताच राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळाला आहे. आम आदमी पक्षाने युपीए सरकार विरोधात आंदोलन करतच राजकारणात एंट्री घेतली. पण आता अवघ्या काही वर्षात पुन्हा विरोधकांच्या एकीसाठी आम आदमी पक्ष काँग्रेससोबत दिसला. पण भाजपावर टीका करताना काँग्रेसलाही समान अंतरावर केजरीवाल ठेवणार का? हा प्रश्न कालच्या भूमिकेमुळे निर्माण झाला त्यामुळे पहिल्याच बैठकीत विरोधकांच्या एकीतला एक धागा तरी निखळून पडल्याचे दिसत आहे.