Shiv Sena-BJP Alliance : गेल्या काही दिवसांपासून भाजप (BJP) आणि शिवसेना (Shiv Sena) नेत्यांच्या वक्तव्यांवरुन युतीमध्ये (Shiv Sena BJP Alliance) तणाव निर्माण झाल्याची परिस्थिती होती. त्यातच शिवसेनेच्या जाहिरातीमुळे युतीमधील तणाव आणखीच चिघळला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्थीनंतर शिवसेना-भाजप युतीमधील तणाव निवळला. मात्र असे प्रकार पुन्हा घडू नये यासाठी भाजप आणि शिवसेना यांच्याकडून आपापल्या स्तरावर काळजी घेतली जात आहे. शिवसेना आणि भाजप यांच्यातील वाद टाळण्यासाठी भाजप पदाधिकाऱ्यांना पक्ष श्रेष्ठींकडून मौखिक आचारसंहिता (Code of Conduct) लागू करण्यात आली आहे.


अशी आहे भाजप नेत्यांसाठीची आचारसंहिता!


राज्यात कुठेही होर्डिंग लावताना राज्य कार्यकारिणीतील पदाधिकारी असेल तर प्रदेशाध्यक्षांची आणि जिल्हा स्तरावरील पदाधिकारी असेल तर जिल्हा अध्यक्षांची परवानगी घेणे बंधनकारक करण्यात आलं आहे. शिवाय मीडिया संवादासाठी नियुक्त केलेल्या पदाधिकाऱ्यांशिवाय कोणीही मीडियाशी बोलणार नाही, अशी तंबी देण्यात आली आहे. जाहीर कार्यक्रमात भाषण देताना भाजप-शिवसेना महायुतीत तणाव वाढेल अशी वक्तव्ये न करण्याची ताकीद सुद्धा भाजप पदाधिकाऱ्यांना देण्यात आली आहे.


शिवसेना-भाजप युतीमधील तणावाची कारणे


काही दिवसांपूर्वी भाजपने शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांच्या लोकसभा मतदारसंघावर दावा केला होता. त्यांनी राजीनामा देण्याचं वक्तव्य केल्यानंतर युतीमधील मतभेद उघड झाले. त्यानंतर चंद्रशेखर बावनकुळे यांनी श्रीकांत शिंदे हेच सक्षम उमेदवार असल्याचं सांगत वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. मग भाजपच्या मेळाव्यात आमदार संजय केळकर यांनी ठाणे आणि पालघर मतदारसंघही आपलाच असल्याचं म्हटलं होतं. त्यामधून युतीमधील तणाव निवळला नसल्याचं समोर आलं होतं. त्यातच शिवसेनेच्या जाहिरातीवरुन मोठा वाद झाला आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजप नेत्यांमध्ये नाराजी पसरली. जाहिरातीवरुन नाराजी समोर आल्यानंतर शिवसेनेने दुसरी जाहिरात प्रसिद्ध करुन वाद शमवण्याचा प्रयत्न केला. तसंच देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी आमची युती मजबूत असल्याचं सांगितलं. दोन्ही पक्षांतील नेत्यांच्या वक्तव्यांवरुन, जाहिरातीवरुन युतीमध्ये वितुष्ट निर्माण होऊ नये, म्हणून दोन्ही पक्षांकडून काळजी घेतली जात आहे. त्याच एक भाग म्हणून भाजप पक्षश्रेष्ठींनी आपल्या पदाधिकाऱ्यांसाठी मौखिक आचारसंहिता जारी केली आहे.


BJP Code of Conduct : युतीत वाद टाळण्यासाठी भाजपची पदाधिकाऱ्यांसाठी मौखिक आचारसंहिता ABP Majha



हेही वाचा


Shiv Sena BJP Alliance : सत्तासंघर्षाच्या निकालाचा एक महिना पूर्ण, सरकार टेन्शन फ्री होण्याऐवजी युतीतलं टेन्शन अधिक वाढलं?