Gulabrao Patil on Thackeray Group : गद्दार आणि खोके याशिवाय यांच्याकडे दुसरा मुद्दाच नसून जर गद्दारी करायची असती तर नारायण राणे आणि राज ठाकरे गेले तेव्हाच फुटलो असतो, तेव्हा आमदार होते आणि ऑफर देखील होत्या, अशा शब्दात गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी ठाकरे गटावर (Thackeray Group) तोफ डागत गौप्यस्फोट देखील केला. ठाकरे गटाकडून काल (21 जून) राज्यभर गद्दार दिन साजरा होत असताना गुलाबराव पाटील नेमके याच दिवशी रात्री उशिरा पंढरपूरमध्ये (Pandharpur) दर्शनासाठी पोहोचले होते. यावेळी त्यांना छेडले असता त्यांनी संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांच्यावर तोफ डागली.
आमदारांना परत आणण्याचा प्रयत्नच केला नाही उलट...
"नारायण राणे फुटताना देखील आपल्याला ऑफर होती पण आपण गेलो नाही," असा गौप्यस्फोट गुलाबराव पाटील यांनी यावेळी केला. "स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेली शिवसेना कुठेतरी लयाला चाललेली दिसली आणि सांगून सुद्धा एखादा टिनपाट माणूस उद्धवजींना सल्ला देत होता आणि त्यांचे ऐकले जात होते," असे सांगत त्यांनी संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. "मी ३३ नंबरला गेलो, जाताना सांगून गेलो की फक्त 11 आमदार आता सूरतला पोहोचले आहेत त्यांना परत बोलवा. अजित पवार यांना जर शरद पवार परत बोलावू शकतात तर आपल्या पक्षातील चांगले कार्यकर्ते गेले असताना त्यांना सांगूनही परत बोलावण्याचा प्रयत्न का केला नाही असा माझा प्रश्न होता," असे गुलाबराव यांनी सांगितले. "परत आणण्याचा प्रयत्न सोडाच शिवाय मलाच राऊत म्हणाले की तुम शेर जैसे हो दिल तुम्हारा चुहे जैसा है, तुम्हाला जायचे असेल तर जाऊ शकता. हे महामंडलेश्वर 1008 संजय राऊतांचे वाक्य होते," अशा शब्दात गुलाबराव पाटील राऊत यांच्यावर निशाणा साधला. संजय राऊतांनी उद्धव ठाकरे यांचा चुकीचा भ्रम करुन दिल्याने ही वेळ आल्याचे गुलाबराव पाटील यांनी सांगितलं.
'तुमचे थोरातांशी आय लव्ह यू आणि गद्दार आम्ही का?'
आम्हालाही याचे दुःख होते, आम्ही देखील पक्षवाढीसाठी हयात घालवली, घरावर तुळशीपत्र ठेवली, सहज चार चार वेळा आमदार झालो नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. आता आम्हाला गद्दार म्हणणाऱ्यांनी लक्षात ठेवावे आम्ही गद्दारी केली असती तर काँग्रेस किंवा राष्ट्रवादीत गेलो असतो पण आम्ही शिवसेना सोडली नाही, उलट आम्हालाच शिवसेना पक्ष म्हणून मान्यता मिळाल्याचेही गुलाबराव यांनी सांगितले. आता भाषणात कोणीतरी खोके बोलले, कोणी ज्यांनी काँग्रेसशी हात मिळवून विखे पाटील यांचे पॅनल पडले. म्हणजे तुमचे काँग्रेसच्या बाळासाहेब थोरातांशी आय लव्ह यू आणि गद्दार आम्ही का असा सवाल गुलाबराव पाटील केला.
लोकनेत्यांच्या तुकड्यावर मोठा झालेला माणूस, गुलाबरावांची राऊतांवर टीका
या संजय राऊतांना म्हणावं किमान या महापालिका निवडणुकीत उभे राहून नगरसेवक होऊन दाखवा, तेवढीही त्यांची लायकी नाही, अशी टीका त्यांनी केली. आमच्यावर टीका करणारे संजय राऊत कोणी लोकनेता नाही तर आमच्यासारख्या लोकनेत्यांच्या तुकड्यावर मोठा झालेला माणूस आहे. आम्ही टपरीवरुन मोठे झालोय. 1 लाख 7 हजार मते मिळवली आहेत तेही एकदा दोनदा नाही तर चार वेळेला, पहिल्यावेळी कोणताही पिक्चर चालून जाता राऊताचा कोणता पिक्चर आला आहे, सध्या ग्रामपंचायतीत निवडून येऊ शकत नाही, अशा शब्दात गुलाबराव पाटील यांनी राऊतांवर निशाणा साधला.
हेही वाचा