Maharashtra Congress News: काँग्रेस (Congress) प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांना काँग्रेस महासचिवांनी धक्का दिला आहे. चंद्रपूर (Chandrapur) काँग्रेस जिल्हाध्यक्ष (Congress District President) प्रकाश देवतळे (Prakash Deotale) यांच्यावरील कारवाईला स्थगिती दिली आहे. पटोलेंनी देवतळेंना जिल्हाध्यक्ष पदावरून हटवलं होतं. या कारवाईला काँग्रेस महासचिव के. सी. वेणुगोपाल (K. C. Venugopal) यांच्याकडून स्थगिती देण्यात आली आहे.


चंद्रपूरचे काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे यांना नाना पटोले यांनी जिल्हाध्यक्ष पदावरून हटवलं होतं. या कारवाईला काँग्रेसचे महासचिव वेणुगोपाल यांनी स्थगिती दिली आहे. पटोले यांच्यासाठी हा मोठा दणका मानला जातोय, तर पटोलेंचे पक्षांतर्गत विरोधक विजय वडेट्टीवार यांची सरशी झाली आहे. चंद्रपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत विजय वडेट्टीवार आणि भाजपच्या पॅनलने हातमिळवणी करत खासदार बाळू धानोरकर यांच्या पॅनेलचा पराभव केला होता. त्यानंतर नाना पटोले यांनी काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे यांची जिल्हाध्यक्ष पदावरून उचलबांगडी केली होती. 


काय आहे प्रकरण?


एप्रिल महिन्यात झालेल्या बाजार समितीच्या निवडणुकीत भाजपा जिल्हाध्यक्षाशी हातमिळवणी करून स्वतंत्र पॅनल उभं केलं होतं. निवडणूक निकालानंतर भाजप जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे आणि काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे एकत्र आनंदोत्सव साजरा करत गुलाल उधळत ढोल ताशाच्या तालावर थिरकले होते. देवतळेंचा भाजप जिल्हाध्यक्षांसोबतचं सेलिब्रेशन बघून प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी त्यांचं जिल्हाध्यक्ष पदावरून तत्काळ निलंबन केलं. त्यानंतर लगेच राजुराचे आमदार सुभाष धोटे यांची चंद्रपूर जिल्हा ग्रामीण काँग्रेसच्या प्रभारी जिल्हाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली. 


आता नाना पटोलेंच्या याच निर्णयाला थेट दिल्लीतून स्थगिती देण्यात आली आहे. त्यामुळे काँग्रेसचं प्रदेशाध्यक्ष पदी असलेल्या नाना पटोलेंना दिल्लीतून मोठा दणका दिल्याचं राजकीय वर्तुळात बोललं जात आहे. तसेच, गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसमधील अंतर्गत नाराजी सातत्यानं चर्चांचा विषय बनत आहे. तसेच, नाना पटोलेंच्या काही निर्णयांमुळे पक्षातील काहीजण नाराज असल्याचंही बोललं जात आहे.