Maharashtra Politics : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवाजी पार्कातील (Shivaji Park) इंडिया आघाडीच्या (INDIA Alliance) सभेवर टीका केली आहे. शिवाजी पार्कात हिंदू बंधू भगिनींनो म्हणायला जीभ कचरली का, असं म्हणत उद्धव ठाकरेंवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. हद्दपार झालेले सगळे एकत्र आले होते, कालची सभा म्हणजे फॅमिली गॅदरिंग होती. ठाणे, मुंब्य्रात राहुल गांधींचा फ्लॉप शो, अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे यांच्यासह इंडिया आघाडीच्या सभेवर टीका केली आहे. हिंदू धर्माचा अपमान केला, त्यांना जनताच त्यांची जागा दाखवेल असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राहुल गांधी यांच्यावरही टीका केली आहे.


हिंदू बंधू भगिनींनो म्हणायला जीभ कचरली का?


माझ्या तमाम हिंदू बांधवांनो हा शब्द कालपासून बंद झाला. काल त्यांनी हिंदू बंधू भगिनींनो म्हणणं टाळलं. हिंदू बंधू भगिनींनो म्हणायला जीभ कचरली का, असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर जोरदार निशाणा साधला आहे. ते पुढे म्हणाले की, हिंदू बंधू भगिनींनो म्हणणं टाळलं यावरून आज लक्षात आलं की, बाळासाहेबांचे विचार,त्यांची भूमिका, त्यांची विचारसरणी हे सर्व त्यांनी सोडलं आहे, म्हणूनच आम्हाला त्यांना सोडावं लागलं आणि मोठा निर्णय घेत बाळासाहेबांचे विचार पुढे नेण्याचा विचार करावा लागला. आता त्यांना जनतेनं दोन वर्षांपूर्वी तडीपार केलं आहे, ते काय आम्हाला तडीपार करणार. 


शिवाजी पार्कात सभा घेण्याचा त्यांना नैतिक अधिकार नाही


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेत इंडिया आघाडीच्या सभेवर जोरदार हल्लाबोल केला. यावेळी मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, राहुल गांधींचनी हिंदूंचा अपमान केला आहे, जनताच त्यांना जागा दाखवेल. शिवाजी पार्कात सभा घेण्याचा त्यांना नैतिक अधिकार नाही. 50-60 वर्षात जे काँग्रेस सरकारकडून जे झालं नाही, ते पंतप्रधान मोदींनी 10 वर्षात केलं आहे. त्याचा प्रत्यय आपल्या समोर आहे. देशाचा विकास आपल्या समोर आहे. दोन वर्षात महायुतीनं केलेलं काम सर्वांसमोर आहे, त्यामुळे जनता आमच्या पाठीशी उभी राहिलं, असा विश्वासही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे.


उद्धव ठाकरेंनी माफी मागायला हवी


सगळे नैराश्य चेहऱ्यावर असलेले लोक. उत्तर प्रदेश बिहार, काश्मीरमधून लोकांनी हद्दपार केलेले सर्व लोक काल एकत्र आले होते. त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होतं की, त्यांना जबरदस्तीने आणलं होतं. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या स्मारकासमोर आणि बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळासमोर ही सभा झाली हा काळा दिवस आहे. उद्धव ठाकरेंच्या गटाने काल माफी मागितली होती. ज्यांनी सावरकरांचा, सनातन हिंदू धर्माचा अपमान केला, त्यांच्याबरोबर बसल्याची अपमान करणाऱ्यासोबत उद्धव ठाकरे का बसले, उद्धव ठाकरेंनी माफी मागायला हवी, असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Uddhav Thackeray : भाजप नावाच्या फुग्यात आम्हीच हवा भरली, आता त्यांचा डोक्यात हवा गेली; उद्धव ठाकरेंचा घणाघात