रामटेक: राज्यातील काही नेते फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आरोप करतात. पण नरेंद्र मोदी अशा नेत्यांकडे लक्ष देत नाहीत. मोदींनी (PM Modi) त्यांच्याकडे नजर फिरवली तर फेसबुक लाईव्ह करणाऱ्यांच्या तोंडाला फेस येईल, अशी खोचक टिप्पणी करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. ते बुधवारी रामटेकमध्ये महायुतीच्या उमेदवारांसाठी आयोजित करण्यात आलेल्या प्रचारसभेत बोलत होते. यावेळी एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर स्तुतीसुमनांचा वर्षाव केला. 


देशात सध्या तापमानाचा पारा प्रचंड वाढला आहे. मात्र, या उष्ण तापमानातही रामटेकमध्ये नरेंद्र मोदी यांना ऐकण्यासाठी लाखो लोक आले आहेत. संपूर्ण देशात मोदीनामाचा घोष सुरु आहे. त्यामुळे देशात उष्णतेच्या लाटेप्रमाणेच मोदी लाटही आहे, असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले. पंतप्रधान मोदी रामाच्या आशीर्वादाने देशात विकसित सुराज्य निर्माण करत आहेत. सत्तेसाठी आसुसलेले विरोधक मोदीद्वेषाने पछाडलेले आहेत. ज्यांचे आयुष्य भ्रष्टाचार, घोटाळे आणि पैसे मोजण्यात गेले त्यांना मोदींवर आरोप करण्याचा नैतिक अधिकार नाही. अशा नेत्यांची अवस्था 'अंगात नाही बळ आणि चिमटा काढून पळ', अशी आहे. पण मोदी विरोधकांच्या आरोपांकडे बिलकूल लक्ष देत नाहीत, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले. 


विरोधक मोदींवर जितकी टीका करतील, तेवढाच आमचा फायदा होईल. 2014 आणि 2019 मध्ये विरोधकांनी मोदींवर आरोप केले होते. आतादेखील विरोधक मोदींवर तुटून  पडले आहेत. पण या लोकसभा निवडणुकीत मोदी सर्व रेकॉर्ड मोडीत काढत विजयी होतील. आत्मविश्वास विजयाकडे नेतो, तर अहंकार विनाशाकडे घेऊन जातो. मोदी आत्मविश्वासाने परिपूर्ण आहेत, असा दावा एकनाथ शिंदे यांनी केला.


विदर्भातील सर्व जागा मोदींच्या पदरात टाकू: नितीन गडकरी 


या सभेत भाजपचे केंद्रीय मंत्री आणि नागपूर लोकसभेचे उमेदवार नितीन गडकरी यांनीही भाषण केले. त्यांनी विदर्भात भाजपला मोठा विजय मिळेल, असे भाकीत केले. जेव्हा एखाद्याविरोधात काही बोलायला काही शिल्लक नसेल, लोकांना आपल्या बाजूने वळवता येत नसेल तेव्हा लोकांना कन्फ्यूज केले जाते. विरोधकाही आता देशात मोदी  सरकार पुन्हा आल्यास देशाचे संविधान बदलण्यात येईल, असे सांगून लोकांना संभ्रमात टाकत आहेत. मुस्लीम आणि दलितांना भीती दाखवून मतं मागत आहेत. मात्र, तुम्ही कोणत्याही अपप्रचाराला बळी पडू नका. तुम्हा सर्वांचे भविष्य या निवडणुकीशी जोडलेले आहे. मी मोदींना आश्वासन देतो की, विदर्भातील 100 टक्के जागा एनडीएला मिळतील. मोदींच्या बहुमतात विदर्भाचा मोठा वाटा असेल, असे नितीन गडकरी यांनी सांगितले. 


आणखी वाचा


एकनाथ शिंदे यांचा पक्ष दोन-चार महिन्यांचा, विधानसभेपर्यंत पक्ष राहणार नाही : अंबादास दानवे