छत्रपती संभाजीनगर : एकनाथ शिंदे यांचा पक्ष फक्त दोन चार महिन्यांचा आहे, विधानसभेपर्यंत हा पक्ष राहील असं मला वाटत नाही, असं म्हणत ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी शिंदे सरकारवर निशाणा साधला आहे. महायुतीतील शिंदे गटाच्या उमेदवारी वरुन सध्या राजकारणात मोठ्या हालचाली सुरु आहेत. हिंगोलीचे हेमंत पाटील (Hemant Patil) आणि यवतमाळच्या भावना गवळींचा यांचं लोकसभेचं तिकीट कापण्यात आलं आहे.


शिंदे आणि अजित पवार भाजपच्या ताटाखालचं मांजर


हेमंत पाटील आणि भावना गवळी यांची उमेदवारी जाण्यावर भाष्य करताना अंबादास दानवे म्हणाले की, भारतीय जनता पार्टी यांनी शिंदे आणि अजित पवार यांना ताटाखालचं मांजर बनवून ठेवलेलं आहे, यांच्या म्हणण्याला कोणताही अर्थ नाही, यांच्या बोलण्याला विचाराला आणि वागण्याला कुणी विचारत नाही. जे भारतीय जनता पार्टी म्हणेल तेच यांना करावं लागतं.


भाजपची नवी रणनिती


याआधी असं कधीही झालं नव्हतं की, उमेदवार जागा सुटेल त्यामुळे दुसऱ्या पक्षाने दुसऱ्या पक्षाचा उमेदवार ठरवावा. शिवसेनाप्रमुख आणि उद्धवजी हे ज्यावेळी नेतृत्व करत होते, त्यावेळेस कधी तुमचा उमेदवार हा असावा असं बोलण्याची भारतीय जनता पार्टीची कधीही हिंमत झाली नाही की. जागावाटप हे पक्षाचे होत असतं त्यांनी त्यांचा त्यांचा उमेदवार ठरवायला पाहिजे, अशा प्रकारची भूमिका असते, परंतु हे नवीनच होत आहे. भारतीय जनता पार्टीची एक नीती आहे.


महायुतीवर अंबादास दानवेंचं टीकास्त्र


महायुतीच्या जागावाटपावर टीका करताना अंबादास दानवे म्हणाले की, त्यांच्याकडे त्या कुवतीचे उमेदवारच नाही येत आणि कारण ज्या पद्धतीने महाविकास आघाडीने उमेदवार दिले आहेत, पटापट निर्णय घेतलेले आहेत, शिवसेनेची तिच पद्धत आहे. जे व्हायचं ते होईल एक घाव दोन तुकडे ही शिवसेनेच्या विचारांची पद्धत आहे आणि याच्यातून निश्चितच यश मिळत असते.


महायुतीला संभाजीनगरमध्ये उमेदवारच भेटत नाही


कुणी लढायचं ठरत नाही आणि ठरलं तर उमेदवार सापडत नाही. महायुतीला संभाजीनगरमध्ये उमेदवारच भेटत नाही, हिंगोलीला ही तसेच झाले. यवतमाळला देखील तसेच झाले काही संबंध नसलेले लोक भाजपच्या दबावाखाली महायुतीकडून उमेदवार घोषित होत आहेत आणि याला ओपन-ओपन भाजपचे लोक विरोध करत आहेत. संदिपान भुमरे मुंबई हे लोकसभा निवडणूक लढवणार नाहीत, याची पूर्ण गॅरंटी देतो. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :


मोठी बातमी : एकनाथ शिंदेंच्या चार खासदारांना धक्का! हेमंत पाटील, भावना गवळींचा पत्ता कट, आता हेमंत गोडसे आणि धैर्यशील मानेंचं काय होणार?