मुंबई: राहुल गांधी यांच्या 'भारत जोडो न्याय यात्रे'च्या समारोपावेळी मुंबईच्या शिवाजी पार्कवर झालेल्या कार्यक्रमात उद्धव ठाकरे यांना बोलण्यासाठी फक्त पाच मिनिटं मिळाली. यावरुन त्यांची पत कळून आली. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याकडे आता शिवसेना खासदार आणि आमदार उरलेले नाहीत. त्यामुळे ठाकरेंकडे उरलेल्या पक्षाच्या ताकदीप्रमाणे त्यांना भाषणासाठी फक्त पाच मिनिटं दिली. यावरुन त्यांची पत कळाली, असे वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी केले. ते सोमवारी मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.
एकनाथ शिंदे यांनी संपूर्ण पत्रकार परिषदेत प्रामुख्याने राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली. शिवाजी पार्कवरील कालच्या सभेत देशभरातील सगळे निराश लोक एकत्र आले होते. मोदीद्वेष, व्यक्तीद्वेष हाच त्यांच्या सभेचा मुख्य अजेंडा होता. पंतप्रधान मोदींनी देशाला एका नव्या उंचीवर नेऊन ठेवले. मात्र, त्यांच्याविरोधात 'चौकीदार चोर है' घोषणा देण्यात आली. पण देशातील लोकांनी तुम्हाला तुमची जागा दाखवली. यावेळीही विरोधकांकडे पंतप्रधानपदाचा चेहरा नाही, असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले.
उद्धव ठाकरेंनी हिंदू शब्दाचा त्याग केला: एकनाथ शिंदे
उद्धव ठाकरे आपल्या भाषणाची सुरुवात नेहमी,'माझ्या तमाम हिंदू बांधवांनो आणि भगिनींनो' करतात. पण कालच्या सभेत उद्धव ठाकरे यांनी हिंदू हा शब्द उच्चारला नाही. यावरुन लक्षात आलं की, उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांचे विचार, त्यांचं धोरण आणि विचारधारा सोडून दिली आहे. त्यामुळेच आम्हाला त्यांची साथ सोडण्याचा निर्णय घ्यावा लागला. काल उद्धव ठाकरे यांनी, 'अब की बार भाजपा तडीपार' अशी घोषणा दिली. पण उद्धव ठाकरे यांनाच महाराष्ट्रातील शिवसैनिकांनी आणि जनतेने तडीपार केले आहे, अशी टीका एकनाथ शिंदे यांनी केली.
आम्ही राज्य एक नंबरला नेऊन ठेवलं, लोकसभा निवडणुकीत आम्हाला फायदा होईल: एकनाथ शिंदे
गेल्या दीड-दोन वर्षांमध्ये राज्यात झालेल्या विकासकामांविषयी मी मुख्यमंत्री म्हणून समाधानी आहे. या काळात महाराष्ट्रात अनेक योजना आल्या आहेत. राज्याने सर्वच क्षेत्रात प्रगती केली आहे. पायाभूत सुविधांमध्ये राज्य एक नंबरला आहे. तसेच परकीय गुंतवणुकीतही महाराष्ट्र आघाडीवर आहे. त्यामुळे राज्यातील जनतेमध्ये सरकारविषयी सकारात्मक वातावरण आहे. आमचं सरकार प्रो-पीपल आहे. आम्हाला येणाऱ्या निवडणुकांमध्ये या गोष्टीचा फायदा होईल, असा विश्वास एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.
आणखी वाचा
भारतीय जनता पार्टी म्हणजे खंडणी गोळा करणारी टोळी; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल