मुंबई: राज्यात लोकसभा निवडणुकीत महायुतीचा दारुण पराभव झाल्यानंतर आता विधानसभा निवडणुकीत काय घडणार, याची चर्चा आतापासूनच सुरु झाली आहे. लोकसभा निवडणुकीत शिंदे गटाने 7 जागांवर विजय मिळवला असला तरी मुंबईत ठाकरे गटाने (Shivsena Thackeray Camp) दणदणीत विजय मिळवला होता. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीतही मुंबईत ठाकरे गट वरचढ ठरु शकतो, अशी शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी आतापासूनच मोर्चेबांधणी करायला सुरुवात केली आहे. याचा रणनीतीचा एक भाग म्हणून आता एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे गटाचे वर्चस्व असलेली विमानतळ नागरी कर्मचारी संघटना आपल्या ताब्यात घेण्यासाठी डाव टाकला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या संघटनेतील कर्मचाऱ्यांच्या पगारात घसघशीत वाढ केली आहे. हा उद्धव ठाकरे यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे. 


एकनाथ शिंदेंनी नेमकं काय केलं?


मुंबई विमानतळावरील भारतीय कामगार सेना या संघटनेवर उद्धव ठाकरे गटाचे वर्चस्व आहे. राज्यात सत्तापालट झाल्यानंतरही उद्धव ठाकरे गट या संघटनेवर वर्चस्व राखून आहे. मात्र, आता एकनाथ शिंदे यांनी ही संघटना आपल्या बाजूने वळवण्यासाठी या संघटनेच्या कर्मचाऱ्यांचे पगार वाढवले आहेत. आतापर्यंत या संघटनेच्या कर्मचाऱ्यांचा पगार 4 हजार इतका होता. मात्र, मुख्यमंत्र्यांनी या कर्मचाऱ्यांचे मानधन 8 हजार 600 इतके केले आहे. याचा अर्थ या कर्मचाऱ्यांचा पगार दुप्पट झाला आहे. 100 टक्क्यांच्या या पगारवाढीमुळे या संघटनेतील पदाधिकारी आणि कार्यकर्त आपल्या निष्ठा बदलणार का, हे पाहावे लागेल. 


मुख्यमंत्र्यांच्या निर्णयामुळे कोणाकोणाला फायदा?


या पगारवाढीचा फायदा  मुंबई विमानतळावर अंतर्गत स्टाफ म्हणून काम करणारे सफाई कामगार, चालक, कार्गो लोडर आणि लिफ्ट ऑपरेटर यांना मिळणार आहे.  युनियन अध्यक्ष कुणाल सरमळकर यांच्या नेत्तृत्वात या कर्मचाऱ्यांची ३ वर्षांसाठी नियुक्ती करण्यात आली. त्यासंदर्भात करार करण्यात आला. आता या कर्मचाऱ्यांना प्रत्येकी 5800 रूपयांचा वाढीव भत्ता, 2800 चा डीअरन्स अलाऊन्स असा एकूण 8600 रुपये पगार मिळणार आहे. त्याचसोबत पाच लाखांचा आरोग्य विमा अशा विविध योजनांचा लाभ मिळाला आहे. 


आणखी वाचा


राजन विचारे पैसे द्यायचा नाही ना वडापाव खाऊ घालायचा, पण माझ्या सांगण्यावर कार्यकर्ते काम करायचे: एकनाथ शिंदे