Baramati Loksabha : पुणे - बारामती लोकसभा मतदारसंघात यंदा नणंद विरुद्ध भावजय लढत आहे. शरद पवारांच्या कन्या आणि बारामतीच्या विद्यमान खासदार सुप्रिया सुळे विरुद्ध अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्यात थेट सामना होत असल्याने राज्यासह देशाचे लक्ष या निवडणुकीकडे लागले आहे. त्यातच, पवार कुटुंबातील या सामन्यावरुन शरद पवारांना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर, बाहेरुन आलेले पवार म्हणत शरद पवारांनी अप्रत्यक्षपणे सुनेत्रा पवारांना टोला लगावला होता. त्यावरुन, राज्याच्या राजकारणात चांगलाच गोंधळ उडाला. तर, अजित पवारांनीही शरद पवारांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं होतं. आता, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी या वादात उडी घेतली असून सुनेत्रा पवार यांचा अर्ज दाखल केल्यानंतर आयोजित सभेतून थेट शरद पवारांवरच हल्लाबोल केला आहे.
बारामतीमधील निवडणूक लढतीसंदर्भात बोलताना, शरद पवारांनी मूळ आणि बाहेरचे पवार असे म्हणत सुनेत्रा पवार ह्या सुन आहेत, तर सुप्रिया ही पवारांची लेक असल्याचं बोलून दाखवलं होत. त्यावर, आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी थेट हल्लाबोल केला आहे. ''ज्यांना लेकीत आणि सुनेत अंतर वाटते त्यांना मनातल्या मनात मांडे खाऊ द्या. ज्यांच्या मनात मांडे असतात त्यांच्या पदरात धोंडे पडल्याशिवाय राहणार नाही. सुनेत्रा पवार आणि अजित पवार बारामतीचा कायापालट केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाहीत, असे मतही मुख्यमंत्री शिंदेंनी व्यक्त केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला महासत्ता बनवण्याचे स्वप्न पाहिले असून ते सत्यात उतरवण्यासाठी सुनेत्रा पवार यांना निवडून द्यावे लागेल. तीन उमेदवारांचे फॉर्म भरायला महाविकास आघाडीकडे आपल्यापेक्षा निम्मी गर्दी आहे. त्या तुलनेत आपला एक फॉर्म भरायला एवढी प्रचंड जनता येथे आली आहे, ही उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या कामाची पोचपावती असून बारामतीमध्ये महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार मोठ्या मताधिक्याने विजयी होतील, असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला.
पुणे जिल्ह्यातील बारामती लोकसभा मतदारसंघातून महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा अजित पवार यांचा उमेदवारी अर्ज आज दाखल करण्यात आला.याप्रसंगी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे, महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार, उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील अशी दिग्गज मंडळी अर्ज भरताना पुण्यात आली होती. दुसरीकडे खासदार सुप्रिया सुळे यांनीही आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे, आता दोन्ही उमेदवारांच्या प्रचाराला गती मिळणार असून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडतानाचे पाहायला मिळेल.