नागपूर: राज्यातील जातीयवादी आंदोलनांच्या माध्यमातून मला टार्गेट करणाऱ्यांना निवडणुकीतून उत्तर मिळाले आहे, असे वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केले. परभणीत एका मनोरुग्णाने ज्याप्रकारे भारताच्या संविधानाचा अपमान केला, त्या मनोरुग्णाला अटक करण्यात आली. त्यानंतर दुर्दैवाने उद्रेक झाला. मला यानिमित्ताने विनंती करायची आहे की, एका मनोरुग्णाच्या कृत्यावर असंवैधानिक पद्धतीने उद्रेक करणे योग्य नाही. ते डॉ. बाबासाहेब आंबडेकर यांना मंजूर झाले नसते. हे सरकार संविधानाचा सर्वोच्च सन्मान करणारे आहे. कुठल्याही परिस्थितीत संविधानापेक्षा तसूभरही वेगळं काम आम्ही करणार नाही. महायुती सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर नागपूरमध्ये रविवारी रात्री आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस यांनी परभणीतील हिंसाचाराबाबत (Parbhani Violence) बोलातना यासंदर्भात भाष्य केले.


राज्यातील मराठा आंदोलन, परभणीतील उद्रेक अशा जातीयवादी आंदोलनातून तुम्हाला टार्गेट केले जाते, असा प्रश्न यावेळी देवेंद्र फडणवीस यांना विचारण्यात आला. त्याला उत्तर देताना  फडणवीस यांनी म्हटले की, मला टार्गेट करण्याच्या संदर्भात जो विषय त्याचं उत्तर या निवडणुकीने दिलंय, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले. परभणी हिंसाचार प्रकरणात सगळी कारवाई केली आहे. आम्ही पोलिसांना सांगितलं आहे की, आकसबुद्धीने कारवाई करु नका. पण कोम्बिंग ऑपरेशन करु नका. पण जे लोक कॅमेऱ्यात लाठ्याकाठ्या  घेऊन तोडफोड करताना आणि दगड मारताना दिसत आहेत, त्यांच्यावर कडक कारवाई झालीच पाहिजे, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले. 


बीडमधील सरपंच संतोष देशमुख प्रकरणात काय कारवाई? देवेंद्र फडणवीस म्हणाले...


काही दिवसांपूर्वी बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची अपहरण करुन हत्या करण्यात आली होती. यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले की, बीड जिल्ह्यात एका सरपंचाची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. यासंदर्भात काही लोकांवर कारवाई झाली आहे, काहींना निलंबित करण्यात आले आहे, काही लोकांना घरी पाठवण्यात आले आहे. पोलिसांनी 3 आरोपींना पकडले आहे, 4 आरोपींचा शोध सुरु आहे. हे प्रकरण सीआयडीकडे सोपवले असून चौकशीसाठी विशेष तपास पथक (SIT) स्थापन करण्यात आले आहे. आम्ही सगळी चौकशी करणार आहोत. कुठल्याही परिस्थितीत आरोपी कोणीही असो, कुठल्याचा आरोपीला सोडलं जाणार नाही. अशा घटना महाराष्ट्रात गांभीर्याने घेतल्या जातात आणि जातील. त्यामुळे एसआयटीच्या माध्यमातून सगळे धागेदोरे शोधून काढण्याचे काम करु, असे आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी दिले.



आणखी वाचा


आरोपींना लगेच जामीन कसा मिळाला, शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना अस झालं नव्हतं; सोनवणेंचा सवाल