बीड : पुण्यातील हडपसर येथे चक्क आमदाराच्या मामाची अपहरण करुन हत्या करण्यात आल्याची घटना घडली होती. त्यानंतर, बीड जिल्ह्याच्या केज (Kej) तालुक्यातील मस्साजोग येथेही सरपंचाचे अपहरण करून खून करण्यात आल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. संतोष देशमुख असे सरपंचाचे नाव असून त्यांचा मृतदेह केज परिसरात आढळून आल्याने गावातील नागरिक संतप्त झाले आहेत. मृताच्या नातेवाईकांनी अहमदनगर -अहमदपूर महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करत आरोपीला अटक करण्याची मागणी केली होती. दरम्यान, या घटनेनं बीड जिल्हा हादरला असून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनीही या घटनेची दखल घेत मस्साजोग गाव गाठलं आहे. तर, दुसरीकडे बीडचे खासदार बजरंग सोनवणे (Bajrang sonavane) यांनीही या घटनेवर प्रतिक्रिया देताना थेट मुख्यमंत्र्यांवरच निशाणा साधला.
बीड जिल्हा सरपंचाच्या हत्येने हादरला असून जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यावरून बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी प्रतिक्रिया देताना थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच लक्ष्य केलंय. जिल्ह्यातील परिस्थिती गंभीर आहे, अतिशय टॉर्चर करून सरपंच यांची हत्या करण्यात आली आहे. पोलिसांनी आरोपी पकडले आणि त्यांना लगेच जामीन देखील मिळाला. असा कसा जामीन झाला, असा सवाल बजरंग सोनवणे यांनी उपस्थित केला आहे. आरोपीसोबत चार तास पोलिस निरीक्षक होते. पोलीस अधिकारी आरोपींना पाठीशी घालत आहेत, शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना अस झालं नव्हता, असे म्हणत सोनवणे यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच टोला लगावला आहे.
आंदोलकांनी बस पेटवली
केज शहरातील शिवाजी चौकात संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी आरोपीला अटक करा, अशी मागणी करत आंदोलन करण्यात आले. या मागणीसाठी आंदोल संतप्त झाले आणि त्या संतप्त आंदोलकांनी केज-कळंब रोडवर बस पेटवल्याची घटना घडली. मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हस्ते प्रकरणी आरोपींना तत्काळ अटक करावी या मागण्यासाठी केज शहरातील शिवाजी महाराज चौकातही रास्ता रोको सुरू आहे.
मनोज जरांगे सांत्वन करण्यास पोहोचले
दरम्यान, संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर मनोज जरांगे पाटील हे मस्साजोगमध्ये पोहोचले आहेत. सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांचं सांत्वन करण्यासाठी पोहोचले.
हेही वाचा
विधानसभेचा निकाल, VVPAT मधील तफावतीबाबत निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा, पत्रक जारी