नागपूर :  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमधील मंत्रिमंडळाचा विस्तार आज नागपूर येथील राजभवनावर पार पडला. या शपथविधी सोहळ्यात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या 11 आमदारांना मंत्रिपदाची शपथ देण्यात आली. आज एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या मंत्र्यांकडून एक प्रतिज्ञापत्रावर सही घेण्यात आल्याची माहिती आहे. या प्रतिज्ञापत्रात एकूण 7 प्रमुख मुद्दे असल्याची माहिती आहे. त्यानुसार आज शपथ घेतलेल्या मंत्र्यांचा कालावधी अडीच वर्षांचा असेल हा प्रमुख मुद्दा त्यामध्ये असल्याची माहिती आहे. 

Continues below advertisement


प्रतिज्ञापत्रात नेमकं काय म्हटलंय?


एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या मंत्र्यांसाठीच्या प्रतिज्ञापत्रात 7 मुद्दे आहेत. मंत्र्यांचा कार्यकाळ अडीच वर्ष असेल, हा प्रमुख मुद्दा असल्याची माहिती आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर पक्षाचे मुख्य नेते म्हणून पूर्ण विश्वास असेल. एकनाथ शिंदे जो निर्णय घेतील, तो मान्य असेल हे प्रमुख मुद्दे त्यामध्ये आहेत, अशी माहिती आहे. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या आज शपथ घेणाऱ्या सर्वांनी प्रतिज्ञापत्रावर सही केल्याची माहिती आहे.


शिवसेनेच्या कोणत्या आमदारांना मंत्रिपद  


1.उदय सांमत
2.प्रताप सरनाईक
3.शंभूराज देसाई
4.भरत गोगावले
5.प्रकाश आबिटकर
6.दादा भूसे
7.गुलाबराव पाटील
8.संजय राठोड
9.संजय शिरसाट 
10.योगश कदम
11.आशिष जैस्वाल


तीन माजी मंत्र्यांचा पत्ता कट


एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या मंत्रिमंडळातील नेत्यांना डच्चू दिला आहे. त्यामध्ये दीपक केसरकर, तानाजी सावंत आणि अब्दुल सत्तार यांच्या नावाचा समावेश आहे. 


मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यानं नाराजी सत्र


एकनाथ शिंदे यांच्याकडून मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यानं काही आमदारांनी नाराजी व्यक्त केल्याचं देखील पाहायला मिळालं. भंडाऱ्याचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी नाराजी व्यक्त करत शिवसेना उपनेतेपदाचा राजीनामा दिला. याशिवाय पूर्व विदर्भ संघटक पदाचा देखील राजीनामा दिला आहे. भविष्यात वेळ पडल्यास आमदारकीचा राजीनामा देईन, असं देखील ते म्हणाले. मुंबईतील मागाठाणे विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रकाश सुर्वे यांनी देखील त्यांच्या भावनांना वाट मोकळी करुन दिली.तानाजी सावंत यांना देखील मंत्रिपद न मिळाल्यानं ते नाराज असल्याचं दिसून आलं. याशिवाय दीपक केसरकर यांची नाराजी देखील लपून राहिली नसल्याचं समोर आलं. 


एकनाथ शिंदे यांनी देखील मंत्र्यांच्या कामगिरीचा देखील विचार करणार असल्याचं म्हटलं. त्यामुळं शिवसेनेच्या मंत्र्यांना चांगली कामगिरी करुन दाखवावी लागणार आहे.  शिवसेनेतील 9 आमदारांनी आज कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. तर, दोन मंत्र्यांनी राज्यमंत्रिपदाची शपथ घेतली. 



इतर बातम्या :


संघर्ष माझ्या पाचवीलाच, मंत्रिमंडळात संधी मिळाली असती तर सोनं केलं असतं, प्रकाश सुर्वेंना अश्रू अनावर