मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज बीड दौऱ्यावर आहेत. भाजप आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांच्या आष्टी मतदारसंघातील खुंटेफळ साठवण तलाव प्रकल्पाचे लोकार्पण मुख्यमंत्र्यांच्याहस्ते करण्यात येत आहे. खुंटेफळ तलावामुळे 30 गावांतील तब्बल 80 हजार एकर ओलिताखाली येणार आहे. 2800 कोटींच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पातून हजारो शेतकऱ्यांना फायदा होणार असल्याचे आमदार धस यांनी सांगितले आहे. मुख्यमंत्र्यांच्या या दौऱ्यानिमित्त आमदार, बीडमधील मंत्री देखील बीडमध्ये दाखल झाले आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतच मंत्री पंकजा मुंडे याही आष्टी मतदारसंघात पोहोचल्या असून हेलिपॅडवर दोन्ही नेत्यांचं स्वागत करण्यात आलं आहे. मात्र, आजच्या कार्यक्रमाला मंत्री धनंजय मुंडे प्रकृती कारणास्तव हजर राहणार नाहीत. स्वत: धनंजय मुंडेंनी (Dhananjay munde) ट्विट करुन याबाबत माहिती दिली.
आमदार धस यांच्याकडून आयोजित सरकारी कार्यक्रमाला धनंजय मुंडे यांना देखील शासकीय निमंत्रण आहे. मात्र, ते जाणार नसल्याचे कालच स्पष्ट झालं होतं. ''माझ्या डोळ्यावर आज मुंबई येथे पद्मश्री डॉ.टी.पी.लहाने सर यांच्या खासगी रुग्णालयात छोटीशी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. डॉक्टरांनी पुढील चार ते पाच दिवस काळजी व विश्रांती घेण्यास सांगितले आहे. त्यामुळे पुढील पाच दिवस कृपया मला भेटता येणार नाही. सोमवारपासून मी पूर्ववत कार्यालयात सेवेत रुजू असेल,'' अशी माहिती धनंजय मुंडेंनी ट्विटरद्वारे दिली आहे. त्यामुळे, राजकीय वर्तुळात आणि बीड जिल्ह्यात चर्चांना उधाण आले आहे. त्यातच सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी पत्रकार परिषद घेऊन धनंजय मुंडेंवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केल आहेत. तसेच, धनंजय मुंडेंनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणीही त्यांनी केलीय.
मुंडे आणि दमानिया यांच्या वार-पलटवार
दरम्यान,दमानिया यांच्या आरोपांवर धनजंय मुंडेंनीही पत्रका परिषद घेऊन आपली बाजू मांडली. तसेच, ''अंजली दमानिया यांनी आज दिवसभरात दुसऱ्यांदा पत्रकार परिषद घेत पुन्हा एकदा खोटे व बेछूट आरोप केले आहेत. या विषयासह विविध विषयांवर मोघम आरोप करणाऱ्या अंजली दमानिया ताई यांच्या विरोधात आपण आता फौजदारी अब्रू नुकसानीचा खटला मुंबई उच्च न्यायालयात दाखल करणार असल्याचे धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे. त्यामुळे, दमानिया विरुद्ध मुंडे हा वाद राज्यभर चर्चेत आहेत. त्यातच, आज मुख्यमंत्री बीड दौऱ्यावर असल्याने बीडकडेही सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. बीडमधील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर बीड जिल्ह्यातील सामाजिक व राजकीय वातावरण तणावग्रस्त झाल्याचं दिसून येत आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच बीडच्या दौऱ्यावर आहेत.