सातारा: सातारा जिल्ह्याच्या राजकारणात आज मोठी घडामोड घडली आहे. शरद पवारांच्या पक्षातून अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाण्याच्या चर्चा सुरू असतानाच आज निंबाळकर यांच्या घरावर आयकर विभागानं छापा टाकल्याची माहिती समोर आली आहे. माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांचे चुलत बंधू संजीवराजे नाईक निंबाळकर (Sanjeevraje Naik Nimbalkar), रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांच्या घरावर आज सकाळी आयकर विभागानं छापा टाकल्याची माहिती समोर आली आहे. आज सकाळीच आयकर विभागाचं पथक संजीवराजे (Sanjeevraje Naik Nimbalkar) यांच्या घरी दाखल झालं. सकाळी 6 वाजल्यापासून पथकाकडून झाडाझडती सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्या घराबाहेर सकाळपासून कार्यकर्त्यांनी देखील मोठी गर्दी केली आहे. बंगल्यामध्ये जाण्यासाठी कोणालाही परवानगी देण्यात येत नसल्याची माहिती आहे, तर आर्थिक व्यवहाराबाबत चौकशी अधिकारी यांच्याकडून प्रश्न विचारण्यात आले असल्याची माहिती आहे.
घरातील कर्मचारी, कुटुंबातील सदस्यांना प्रश्न विचारणं सुरू
आज सकाळी 6 वाजता आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी रघुनाथराजे आणि संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या बंगल्यावर धाडी टाकल्या आहेत. एकाच वेळी पुणे, मुंबई आणि फलटण येथील निवासस्थानी धाडी टाकण्यात आल्या आहेत. रघुनाथराजे यांचे स्वीय सहायक महेश ढवळे यांच्या घरी देखील धाडी टाकण्यात आल्या आहेत. घरातील सोन्याच्या आणि चांदीच्या वस्तू कुठून आल्या, घरात असलेली रक्कम तसेच विविध ठिकाणचे आर्थिक व्यवहार याबाबत चौकशी अधिकारी यांच्याकडून प्रश्न विचारण्यात आले आहेत, अशी माहिती आहे. आज सकाळपासून संजीवराजे आणि रघुनाथराजे यांना प्रश्न विचारल्यानंतर घरातील कर्मचारी आणि कुटुंबातील सदस्य यांना देखील प्रश्न विचारणं सुरू आहे. निंबाळकर कुटुंबियांकडून आपण व्यवस्थित असून कार्यकर्त्यांनी गर्दी करू नये असं आवाहन देखील करण्यात आलं आहे.
आज(बुधवारी, ता-4) सकाळी सहा वाजल्यापासून आयकर विभागाकडून धाड टाकून त्यांची चौकशी सुरू आहे. संजीवराजे नाईक निंबाळकर हे रामराजे निंबाळकर यांचे चुलत बंधू आहेत. घरी धाड टाकल्याची माहिती मिळताच घराबाहेर कार्यकर्ते जमल्याची माहिती आहेत. बंगल्यामध्ये कोणालाही प्रवेश दिला जात नसल्याची माहिती आहे. त्यांच्या घराबाहेर मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते जमा झाले आहेत. या धाडीमागचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. रघुनाथराजे नाईक निंबाळकर हे शरद पवार यांच्या पक्षात आहेत, तर संजीव राजे नाईक निंबाळकर यांनी निवडणुकीआधी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला होता.