नागपूर: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर भाजपचा मोठा दबाव आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दबावाखाली ते पिचून गेले असून, त्यांना स्वत:च घेतलेले निर्णय बदलण्याची वेळ आली. महाविकास आघाडीच्या काळात नगरविकास मंत्री असताना त्यांच्या विभागानेच मनपासाठी त्रिसदस्यीय प्रभाग रचना आणली होती. ऐनवेळेवर त्यांनी ती बदलली. यावरून मुख्यमंत्री शिंदे किती दबावात आणि प्रभावात आहे, याचा अंदाज येतो अशी टीका राज्याचे माजी ऊर्जामंत्री व कॉंग्रेस नेते नितीन राऊत यांनी केली.


उध्दव ठाकरे यांच्या मंत्रीमंडळात ते नगरविकास मंत्री होते. या विभागांतर्गत मनपाचा कारभार चालतो. त्यामुळे राज्यातील महापालिकेतील निर्णयावर या विभागाचा पगडा असतो. शिंदे हे या खात्याचे मंत्री असताना मंत्रीमंडळाच्या बैठकीत प्रभाग रचनेचा विषय होता. राऊत म्हणाले, 'त्यावेळी त्रिसदस्यीय प्रभाग रचनेला मंत्रीमंडळ बैठकीत विरोध केला होता. एक वा दोन सदस्यीय प्रभाग करावा, अशी आपली मागणी होती. परंतु, शिंदे यांच्या मंत्रालयाने त्रिसदस्यीय प्रभाग रचना मंजूर केली.'


चार सदस्यीय प्रभाग रचना नागरिकांसाठी व नगरसेवकांसाठीही अडचणीची आहे. नागरिकांचाच याला विरोध आहे. चार सदस्यीय प्रभाग ठेवायचा असेल तर नगरसेवकांनाही प्रभागाचे भाग वाटून द्यायला पाहिजे. नागरिक समस्या घेऊन जात असताना नगरसेवक काम करीत नाही. नगरसेवकांची कामे आमदारांना करावी लागत आहे. त्यामुळे कामे लांबणीवर पडत आहे. परिणामी, नागरिकांमध्ये नाराजी व संताप वाढत आहे. आता परत तीनऐवजी चार सदस्यीय प्रभाग करून शिंदे व भाजप सरकार नागरिकांच्या भावनांशी खेळत आहे.


भाजपला पराभवाची भीती


त्रिसदस्यीय प्रभाग रचना ही भाजपसाठी अडचणीची आहे. या रचनेत पक्षाचा पराभव होईल, अशी भीती त्यांना होती. त्यामुळेच फडणवीस व भाजप मुख्यमंत्री शिंदेंवर दबाव वाढवित आहे. शिंदेंच्या खांद्यावर बंदुक ठेवून भाजप ही खेळी खेळत आहे. यावरून भाजपचा मुख्यमंत्री शिंदेवर वाढता दबाव नागरिकांसाठी पुन्हा त्रासदायक ठरणारा असेल, असे राऊत म्हणाले.


NMC Elections 2022 : शिंदे-फडणवीस सरकारविरुद्ध कोर्टात जाणार, मनपा प्रभागपद्धत बदलावर राष्ट्रवादी शहर अध्यक्षांचा इशारा