Aurangabad Crime News: गेल्या काही दिवसांपूर्वी चर्चेत आलेल्या मराठवाड्यातील 'तीस-तीस' घोटाळ्यातील गुंतवणूकदरांची यादी 'एबीपी माझा'च्या हाती लागली आहे. यातील मुख्य आरोपी संतोष राठोड अजूनही हर्सूल कारागृहात असून, त्याला जामीन मिळत नाही. तर दुसरीकडे राठोड बाहेर आल्यावर आपले पैसे मिळतील अशी अपेक्षा गुंतवणूकदारांना लागली आहे. भक्कम परताव्याच्या मोहातून लोकांनी कोट्यवधी रुपये या योजनेत गुंतवले होते. या मोहात फक्त सर्वसामान्यच नाही तर पोलीस, शिक्षक, राजकारणी, वाळू व्यावसायिक आणि शासकीय कर्मचारी आणि अधिकारी सुद्धा वाचले नाही.
या लोकांची गुंतवणूक...
संतोष राठोड याने आपल्याकडे गुंतवणूक करणाऱ्या लोकांची नोंदी तीन वेगवेगळ्या डायरीत करून ठेवल्या होत्या. ज्यात अनेक मोठी नावे आहेत. ज्यामध्ये माजी मंत्र्याचा नातेवाईक, एक आमदार, एक डीवायएसपी, एक सहायक पोलीस निरीक्षक, चार पोलीस कर्मचारी, दहा शिक्षक, परभणी जिल्ह्यातील एक माजी नगराध्यक्ष आणि नगरसेवक, कन्नड तालुक्यातील एक नगरसेवक, औरंगाबाद जिल्ह्यातील दोन सरपंच (एक सरपंच पती), दोन माजी जिल्हा परिषद सदस्य, एक पंचायत समिती सदस्य, एक ग्रामपंचायत सदस्यांने सुद्धा तीस-तीसमध्ये गुंतवणूक केली आहे. सोबतच एक शासकीय कंत्राटदार, तीन वाळू व्यावसायिक, एक पोलीस पाटील, एका पक्षाचा जिल्हाध्यक्ष, पाटबंधारे विभागाचा एक अधिकारी, एक बँक कर्मचारी आणि चार हॉटेल चालक यांनी सुद्धा मोठी गुंतवणूक या योजनेत केली असल्याचं यादीतून स्पष्ट होत आहे.
शेतकरी मोठ्याप्रमाणावर अडचणीत...
तीस-तीस योजनेत गुंतवणूक करणाऱ्या लोकांमध्ये शेतकऱ्यांचा मोठा समावेश आहे. अनेकांनी शासकीय योजनेत जमीन गेल्यानंतर मिळालेला मोबदला या योजनेत गुंतवला होता. मात्र आता आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर काही लोकांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. तर काही जण आपले पैसे परत येतील अशी अपेक्षा लावून बसले आहेत.
पैशासाठी थेट अपहरण...
तीस-तीस घोटाळ्याचा एकूण आकडा तीनशे कोटीच्या घरात असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान आता मुख्य आरोपी कारागृहात असल्याने मध्यस्थी करणाऱ्यांना गुंतवणूकदार पैसे मागत आहे. अशाच एका तीस-तीस घोटाळ्याच्या व्यवहारातून तीन दिवसांपूर्वी एकाचे अपहरण करण्यात आले होते. मात्र पोलिसांनी वेळीच दखल घेत अपहरण झालेल्या व्यक्तीची पुण्यातून सुटका केली.