मुंबई : राज्य विधिमंडळाचे अधिवेशन आजपासून सुरू झाले असून पहिल्याच दिवशी विरोधकांनी शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरुन सरकारला लक्ष्य केलं. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनीही शेतकऱ्यांना त्वरीत कर्जमाफी द्यावी, अशी मागणी करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल केला. राज्यातील शेतकऱ्यांची (Farmer) दयनीय अवस्था कथित करताना, राज्यात होणाऱ्या शेतकऱ्यांच्या आत्महत्येवर ठाकरेंनी भाष्य केलं. यावेळी, मुख्यमंत्री पंचतारांकीत शेती करतात. राज्यातच नाही, देशात असा दुसरा कुठलाही शेतकरी नसेल, असे म्हणत उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना लक्ष्य केलं. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) दरवर्षी सातारा जिल्ह्यातील आपल्या दरे या मूळगावी जाऊन शेतात पाहणी करतात, वेळप्रसंगी शेतीची कामेही करत असतात. त्यावरुनच, उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना टोला लगावला. 


राज्यात दररोज 9 शेतकरी आपलं आयुष्य संपवत आहेत, अद्यापही 10 हजार 22 कोटींची नुकसान भरपाई देणं बाकी आहे. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांना पीक विमा दिला जात नाही. NDA च्या सरकारने सर्वकही शेपटावर निभावलंय, असे म्हणत राज्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नावर उद्धव ठाकरेंनी भाष्य केलं. नागपूर अधिवेशनात कोणीही न मागता मी शेतकऱ्यांना 2 लाखापर्यंतचं कर्ज माफ केलं होतं. अजूनही 3 महिने निवडणुकीला आहेत, तात्काळ शेतकऱ्यांची कर्जमाफी करा. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनीही घोषणा केली होती, तीही अद्याप पूर्ण झालेली नाही. नुसत्या घोषणा करू नका त्याची अंमलबजावणी करा. शेतकऱ्यांवर बंदुक रोखली आहे, त्यांचा वाली कोण आहे, असे म्हणत शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याची मागणी उद्धव ठाकरेंनी केली. यावेळी, नाव न घेता मुख्यमंत्री शिंदेंवर बोचरी टीका केली.  


''अधिवेशनात आमच्याकडून नागरिकांच्या जिवाभावाचे प्रश्न उपस्थित केले जातील. रोज एक शेतकरी अमरावतीत आत्महत्या करतोय. घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं होतं की, राज्यातील एकही शेतकरी आत्महत्या करणार नाही. त्यांचं ठीक आहे, कारण त्यांची पंचतारांकीत शेती आहे. असा राज्यात नव्हे, देशात कुठलाही शेतकरी नसेल, जो हेलिकॉप्टरने शेतात जातो आणि पंचतारांकीत शेती करतो. विशेषत: अमावस्या-पौर्णिमेला वेगळं काहीतरी पीक काढतात, असं माझ्या कानावर आलंय.'', असे म्हणत उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर जोरदार हल्लाबोल केला.  


पेपर फुटीवरुनही सरकारला टोला


निरोपाच्या अधिवेशनात सरकारकडून मोठ्या घोषणा होण्याची शक्यता असून ते उद्याच घोषणा करतील, ज्या योजना व घोषणा केल्या जातात त्यात आर्थिक तरतूद केली जाते. उद्या घोषणांचा पाऊस पडेल, पण निधीच दिला जाणार नाही, असे म्हणत ठाकरेंनी सरकारवर हल्लाबोल केला. यावेळी,पहिल्याच पावसात राम मंदिरात झालेल्या गळतीवरुन आणि देशभरातील पेपर फुटीवरुनही ठाकरेंनी मोदी सरकारला लक्ष्य केलं. राम मंदीराला गळती झाली, पेपर गळती झाली, असे म्हणत दोन महत्त्वाच्या मुद्द्यांवर भाष्य केलं.  


हेही वाचा


Video : राम मंदिराला गळती, पेपरला गळती; अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी उद्धव ठाकरेंचा घणाघात