नागपूर: लोकसभा निवडणुकीसाठी छत्रपती संभाजीनगरमधून महायुतीचे उमेदवार म्हणून शिंदे गटाचे संदिपान भुमरे यांना रिंगणात उतरवण्यात आले आहे. मात्र, या मतदारसंघातून उमेदवारी मिळावी, यासाठी मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील (Vinod Patil) हे इच्छूक होते. परंतु, महायुतीने संदिपान भुमरे (Sandipan Bhumre) यांना उमेदवारी दिली. त्यामुळे विनोद पाटील यांनी सोमवारी थेट नागपूर गाठले. नागपूरच्या धरमपेठ येथे देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या निवासस्थानी जाऊन विनोद पाटील यांनी त्यांची भेट घेतली. यानंतर विनोद पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. 


मला छत्रपती संभाजीनगरमधून लोकसभेची उमेदवारी मिळावी, ही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची तीव्र इच्छा होती. पण छत्रपती संभाजीनगरमधील दोन आमदार आणि एका राज्यसभा खासदाराने माझ्या उमेदवारीला विरोध केला. छत्रपती संभाजीनगरचा उमेदवार जाहीर झाला आहे. मात्र, सध्या या मतदारसंघातील नेमकी परिस्थिती काय आहे, हे मी देवेंद्र फडणवीस यांच्या कानावर घातले आहे. मला पूर्ण विश्वास आहे की, निवडून येण्याच्या क्षमतेवर (इलेक्टिव्ह मेरिट) माझा नक्की विचार होईल. मला महायुतीकडून लोकसभेची उमेदवारी मिळाली नाही तरी मी छत्रपती संभाजीनगरमधून लढणारच, हे मी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे स्पष्ट केले आहे. या मतदारसंघातून मी योग्य उमेदवार आहे कारण माझं वय हा एक घटक आहे. तसेच मला छत्रपती संभाजीनगरमधील लोकांच्या समस्या आणि प्रश्न माहिती आहेत, असे विनोद पाटील यांनी सांगितले. संभाजीनगरमध्ये मला भरपूर पाठिंबा आहे. मला संभाजीनगरचे प्रश्न कळले असून त्या संदर्भातील व्हिजन माझ्याकडे आहे. फक्त मराठा नेतृत्व म्हणून नाही तर मी अठरापगड जातींचा उमेदवार म्हणून संभाजीनगरमधून उमेदवारी मागत आहे. संदिपान भुमरे मला सन्माननीय आहेत. त्यांच्या कार्यक्षमता आणि वयाबद्दल मी काही बोलणार नाही. मात्र, मोदी, तरुणांना संधी द्या असे म्हणत असताना प्रत्यक्षात राजकारणातही तरुणांना संधी मिळाली पाहिजे, असे मत विनोद पाटील यांनी व्यक्त केले.


विनोद पाटील रिंगणात उतरल्यास छत्रपती संभाजीनगरची लढाई रंगतदार होणार


छत्रपती संभाजीनगर हा लोकसभा मतदारसंघ कायमच प्रतिष्ठेचा राहिला आहे. गेल्या निवडणुकीत वंचित फॅक्टरमुळे शिवसेनेकडे असणाऱ्या या मतदारसंघात एमआयएमचे इम्तियाज जलील निवडून आले होते. यंदादेखील इम्तियाज जलील पुन्हा रिंगणात उतरले आहेत. महाविकास आघाडीकडून ठाकरे गटाचे चंद्रकांत खैरे हे उमेदवार आहेत. तर महायुतीकडून संदिपान भुमरे निवडणुकीच्या रिंगणात असतील. त्यामुळे अगोदरच या मतदारसंघातील लढत चुरशीची झाली आहे. अशात विनोद पाटील अपक्ष म्हणून रिंगणात उतरल्यास छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघातील लढाई कमालीची चुरशीची होऊ शकते. विनोद पाटील यांनी निवडणूक लढवल्यास मराठा मतदार एकगठ्ठा त्यांच्या पाठिशी उभे राहू शकतात. त्यामुळे आता महायुती विनोद पाटील यांच्याबाबत सकारात्मक निर्णय घेणार का, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. 


आणखी वाचा


संदिपान भुमरे संभाजीनगरमधून इच्छुक, पण स्वतःचा पैठण मतदारसंघ जालन्यात; शिंदेंच्या 'मामा'ची अशीही अडचण