मुंबई: आगामी लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील सर्वात प्रतिष्ठेची लढत असलेल्या बारामती मतदारसंघात (Baramati Loksabha) शरद पवार आणि अजित पवार एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. अजित पवार (Ajit Pawar) भाजपसोबत सरकारमध्ये सामील झाल्यानंतर पवार कुटुंबाच्या एकीला तडा गेला होता. मात्र, 2024 ची लोकसभा निवडणूक संपल्यानंतर अजित पवार आणि शरद पवार (Sharad Pawar) यांच्यातील जुनं नातं पुन्हा पूर्ववत होणार का? काका आणि पुतण्या पुन्हा एकत्र येणार का, याविषयी अजित पवार यांनी सूचक भाष्य केले आहे. ते सोमवारी 'एबीपी माझा'ला दिलेल्या विशेष मुलाखतीत बोलत होते.
यावेळी अजित पवार यांना लोकसभा निवडणुकीनंतर शरद पवार आणि तुमच्यातील जुन नातं पुन्हा पूर्वीसारखं होणार का, असा प्रश्न विचारण्यात आला. यावर अजित पवार यांनी म्हटले की, एकदा 7 तारखेला बारामतीचं मतदान होऊ द्या. तोपर्यंत मी या विषयावर काहीच बोलणार नाही. कारण सध्या बारामतीत वेगळा प्रचार सुरु आहे. आम्ही तर पुढे एकत्रच येणार, असे सांगितले जात आहे. हा प्रचार लोकांना बुचकाळ्यात टाकणारा आहे. त्यासंदर्भात माझे मतदार, सहकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये संदेश गेला पाहिजे की, मी जी राजकीय भूमिका घेतली त्याला मी धरुन राहणार आहे. लोकांनी मला साथ द्यावी, मोठ्यांनी आशीर्वाद द्यावेत आणि मतदारांना मला भरभक्कम पाठिंबा द्यावा, असे अजित पवार यांनी सांगितले.
बारामतीच्या लढाईसाठी अजित पवारांनी मन घट्ट केलं
आजपर्यंत बारामती म्हणजे पवार कुटुंब, असे समीकरण होते. परंतु, यंदा बारामतीमध्ये पवार कुटुंबातील दोन दिग्गज नेते एकमेकांविरोधात उभे ठाकले आहेत. शरद पवार यांची कन्या सुप्रिया सुळे आणि अजित पवारांची पत्नी सुनेत्रा पवार या एकमेकांविरोधात रिंगणात आहेत. कुटुंबातील या लढाईबाबत अजित पवार यांना मुलाखतीमध्ये प्रश्न विचारण्यात आला. बहिणीच्या विरोधात प्रचार करताना वेदना होतात का, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. त्यावर अजित पवार यांनी म्हटले की, निवडणुकीत या भावनिक नातं चालत नाही. 7 मे पर्यंत भावनिक, मऊ व्हायचं नाही असे मी ठरवले आहे. बारामतीचा अधिक विकास पाहिजे असेल तर राज्य सरकार आणि केंद्र सरकार मिळून करता आला तर तो अधिक जलद गतीनं करता येईल. बारामतीची जागा लढत असताना समोरचे उमेदवार त्यांच्या परीनं प्रयत्न करत आहेत. ही लढाई भावकी किंवा गावकीची लढाई नाही. देशासाठी ही लढाई लढायची आहे, असे अजित पवार यांनी सांगितले.
आणखी वाचा