छत्रपती संभाजीनगर: लोकसभा निवडणुकीत छत्रपती संभाजीनगरमधून महायुतीकडून आपल्याला उमेदवारी मिळेल, असा विश्वास मराठा आरक्षणासाठी कायदेशीर लढा देणाऱ्या विनोद पाटील यांनी व्यक्त केला आहे. गेल्या काही दिवसांपासून विनोद पाटील हे लोकसभेची उमेदवारी मिळवण्यासाठी चांगलेच सक्रिय झाले आहेत. काल सकाळीच विनोद पाटील (Vinod Patil) यांनी नागपूरमध्ये जाऊन देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची भेट घेतली होती. त्यानंतर विनोद पाटील यांनी आपण कोणत्याही परिस्थितीत निवडणुकीच्या रिंगणात उतरणारच, असे म्हटले होते. उदय सामंत यांनी समजूत काढूनही विनोद पाटील यांनी माघार घेण्यास नकार दिला होता. त्यानंतर विनोद पाटील यांनी 'एबीपी माझा'शी संवाद साधताना छत्रपती संभाजीनगरमधून (Chhatrapati Sambhaji nagar Lok Sabha constituency) आपल्याला उमेदवारी मिळेल, असा विश्वास व्यक्त केला.


उदय सामंत यांनी माझी भेट घेऊन माघार घेण्याबाबत विनंती केली. पण मी त्यांना सांगितलं की, छत्रपती संभाजीनगरच्या उमेदवारी बाबत सर्व्हे करा. सर्व्हेमध्ये माझ्या बाजूने निकाल नसेल तर मी माघार घेईन, असे त्यांनी मी सांगितले. निवडणूक लढवण्यासाठी मी ठाम आहे. मी बालहट्ट करत नाही. 25 तारखेला मी माझा उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. मोदींना पंतप्रधान करण्याचं काम मी करू शकतो. मला आग्रह धरण्याची गरज नाही, मी निवडून येऊ शकत नसल्याचे पटवून द्या, मी माघार घेतो, अशी भूमिका विनोद पाटील यांनी घेतली आहे. आम्ही दरवर्षी हेलिकॉप्टरमधून महापुरुषांवर पुष्पवृष्टी करतो. त्यामुळे हेलिकॉप्टर चिन्ह मिळावे यासाठी प्रयत्न सुरु असल्याचेही त्यांनी सांगितले.


काही नेते मुख्यमंत्र्यांना माझ्याबद्दल चुकीची माहिती देत आहेत: विनोद पाटील


दोन आमदार आणि एक खासदार माझ्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे चुकीची माहिती देत आहेत. उमेदवार बदलण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे योग्य निर्णय घेतील, असा विश्वास विनोद पाटील यांनी व्यक्त केला. यावेळी विनोद पाटील यांनी मनोज जरांगे यांच्यावर आधारित चित्रपटाच्या प्रदर्शनावर घालण्यात आलेल्या बंदीबाबतही भाष्य केले. त्यांनी म्हटले की, मी निवडणूक आयोगाला यासंदर्भात एक पत्र लिहले आहे. मनोज जरांगे यांच्या जीवनावर असलेल्या चित्रपटाला बंदी का घातली जात  आहे. हे योग्य नाही . त्याला चित्रपट म्हणून पहा, असे विनोद पाटील यांनी म्हटले. 


आणखी वाचा


संभाजीनगरमधून इच्छुक 'मराठा' विनोद पाटील थेट नागपुरात, देवेंद्र फडणवीसांच्या भेटीनंतर उमेदवारीबाबत मोठं भाष्य!