Chhagan Bhujbal, Mumbai : "आम्ही मागच्या वेळेस म्हटलं की 80 जागा आम्हाला कमीत कमी मिळाल्या पाहिजेत. तर हे ताबोडतोब माझ्याविरोधात बोलू लागले. मी म्हटलं बर बबा नाही बोलत. जागा वाटपाचे गुऱ्हाळ शेवटपर्यंत चालवून तुमचा फायदा होणार नाही. याचा लवकर निपटारा करायला पाहिजे. उमेदवार काय करायचे नंतर ठरवा. भाजप मोठा पक्ष आहे, मोठा भाऊ आहे, मान्य आहे. पण आम्ही सुद्धा सांगितलं की, आमचे जेवढे आमदार आहेत, तेवढेच शिंदेंचे आहेत. त्यामुळे त्यांना जेवढ्या जागा मिळतील तेवढ्याच आम्हाला मिळायला हव्यात" असे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) म्हणाले. मुंबईत (Mumbai) अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा (Ajit Pawar NCP) वर्धापनदिन साजरा करण्यात आला. यावेळी छगन भुजबळ बोलत होते. 


आता विधानसभेची निवडणूक आहे, म्हणजे संविधानाचा प्रश्न नाही


छगन भुजबळ म्हणाले, आता विधानसभेची निवडणूक आहे, म्हणजे संविधानाचा प्रश्न नाही. संविधान बदलाचे काम होणार नाही. तो लोकसभेचा मुद्दा होता, आता विधानसभेला चालणार नाही. आपले मतदार दलित, ओबीसी, मराठा हे आपले मतदार आपल्याला परत मिळवावे लागतील. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून या गोष्टी आपल्याला कराव्याच लागतील. त्यांना विश्वास द्यावा लागेल. युपीमध्येही संविधानाबाबत प्रचार झाला, त्यामुळे महायुतीच्या जागा कमी आल्या. महायुतीला ठेच लागली आहे, हे नाकारुन चालणार नाही. लोकभा निवडणूकीत महायुतीला ठेच लागली हे नाकारुन चालत नाही. दगडधोंडे बाजूला करावे लागतील. मुंबईत प्रत्येक ठिकाणी विकासकामे सुरू आहेत. ⁠विकास विकास आणि विकास मात्र मुंबईत किती निवडून आले आहेत. लाखो कोटी खर्च केले, मात्र आपले उमेदवार निवडून आले नाहीत, असंही भुजबळ यांनी सांगितलं. 


मुस्लीम समाज, दलित समाज आपल्याला सोडून बाजूला झाले


पुढे बोलताना छगन भुजबळ म्हणाले, मुस्लीम समाज, दलित समाज आपल्याला सोडून बाजूला झाले. 400 पार म्हणालो, त्याचा प्रचार असा झाला की, संविधान बदललं जाणार आहे. मोदींनी खुलासा केला, पण तोपर्यंत लोकांना वाटलं 400 पार म्हणजे आपला बेडा पार झाला. दलित, मुस्लीम समाज आपल्यापासून गेला तर आपलं काय? संविधान बदलणार म्हणजे आपलं आरक्षण जाणार असंही लोकांच्या डोक्यात आलं. आपलं नुकसान करण्यासाठी विरोधी पक्ष प्रचार करणार आहे. आपण त्यामध्ये सुधारणा करु शकलो नाही, हे सत्य आहे. 


पंडित नेहरु, इंदिरा गांधी या सर्वांचे मोठे कटआऊट्स होते


25 वर्षांपूर्वीचा पक्षाची स्थापना झाली तो दिवस मला आठवतो. याच षण्मुखानंद हॉलमध्ये झाली होती. वर्ष पटापट पटापट निघून गेली. सुभाषचंद्र बोस असतील, पंडित नेहरु, इंदिरा गांधी या सर्वांचे मोठे कटआऊट्स होते. गाद्या हातरलेल्या होत्या. त्याच्यावर पवारसाहेब बसलेले होते, आम्ही होतो. तारिक अन्वर होते, संगमा होते. समाजवादी पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विलीन झाला. पण दिल्लीमध्ये काँग्रेस पक्षाचे लोक तिथे गेले, त्यांनी सांगितलं. चरख्याची निशाणी त्यांना मिळता कामा नये, त्यामुळे ते चिन्ह गोठवण्यात आलं. त्यानंतर आपण घड्याळाचं चिन्ह घेतल, झेंडाही तयार केला. शिवाजी पार्क फुलून गेलं, गर्दी होती. त्यावेळीची सभा अतिशय यशस्वी झाली, अशी आठवणही भुजबळ यांनी सांगितली. 


इतर महत्वाच्या बातम्या 


Dhananjay Munde VIDEO: अजित पवारांच्या पायाची शपथ घेऊन सांगतो, धनंजय मुंडे यांचा सुनील तटकरेंना शब्द!