Suhas Kande on Chhagan Bhujbal, Dindori Loksabha : मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्याकडून दिंडोरी लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा प्रचार सुरु आहे, असा आरोप शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे (Suhas Kande ) यांनी केला होता. दरम्यान, आता सुहास कांदे यांनी छगन भुजबळांकडून तुतारीचा प्रचार सुरु असल्याचे पुरावे सादर केले आहेत. भुजबळ व कार्यकर्त्यांकडून तुतारीचा प्रचार सुरू असल्याचे विविध फोटो व पुरावे देत सुहास कांदे यांनी पुन्हा एकदा छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्यावर हल्लाबोल केला आहे. 


भुजबळांचे निकटवर्तीय हे तुतारीचे प्रचार करत असल्याचे पुरावे 


भुजबळांचे खायचे दात वेगळे अन् दाखवायचे दात वेगळे आहेत, असा आरोप कांदे यांनी केला आहे. पुढे बोलताना कांदे म्हणाले,  नांदगाव व येवला विधानसभा मतदार संघातील भुजबळांचे  (Chhagan Bhujbal) निकटवर्तीय हे तुतारीचे प्रचार करत असल्याचे पुरावे माझ्याकडे आहेत. भुजबळांनी (Chhagan Bhujbal) मराठा आरक्षणावेळी मोठे ओबीसींचे मेळावे घेतले. आता महायुतीच्या उमेदवार असलेल्यांसाठी मेळावे घ्यावे व महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार करावा , असा उपरोधिक टोलाही त्यांनी लगावला. 


छगन भुजबळांच्या परिपत्रकावर शरद पवारांचा फोटो 


दरम्यान, सुहास कांदे यांच्या आरोपाचे खंडन करणारे एक पत्र आज राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष विजय पाटील यांनी काढले. मात्र त्या पत्रावर देखील शरद पवार व भुजबळ (Chhagan Bhujbal) यांचा एकत्रित फोटो असल्याने हे कसले संकेत म्हणायचे? असा सवालही कांदे यांनी उपस्थित केला. सुहास कांदेंच्या आरोपांमुळे महायुतीत वाद सुरु होण्याची शक्यता आहे. शिवाय यापूर्वीही छगन भुजबळ यांनी ठाकरे-पवारांना सहानुभूती आहे, असे म्हणत महायुतीला अडचणीत आणल्याची चर्चा आहे. 


दिंडोरीत भास्कर भगरें वि. भारती पवार 


महायुतीने दिंडोरी लोकसभा मतदार संघातून केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार (Bharati Pawar) यांना मैदानात उतरवले आहे. तर शरद पवारांनी (Sharad Pawar) भास्कर भगरे यांना उमेदवारी दिली आहे. भास्कर भगरेंनी सरपंचपदापासून आपला प्रवास सुरु केला आहे. ते पंचायत समितीचे सदस्य देखील होते. त्यानंतर त्यांनी जिल्ह्या परिषद देखील लढवली होती. सध्या ते राष्ट्रवादीचे दिंडोरी तालुकाध्यक्ष म्हणून काम करत होते, शरद पवारांनी त्यांना उमेदवारी देत निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. 


Ajit Pawar : अरे मंत्री व्हायला निघालाय, पठ्ठ्या तू आमदार कसा होतो तेच बघतो, अजितदादांचे शरद पवारांच्या आमदाराला चॅलेंज