Nashik Lok sabha : नाशिक - राज्यातील महाविकास आघाडीच्या सर्वच जागांवर उमेदवारांची घोषणा झाली आहे. मात्र, महायुतीच्या (महायुती) अद्यापही काही जागांवरील तिढा कायम आहे. त्यामध्ये, प्राधान्याने नाशिकच्या लोकसभा मतदारसंघात गोडसे की भुजबळ अशी चर्चा लोकांमध्ये रंगली आहे. कारण, जागावाटपात साताऱ्याची जागा भाजपाने स्वत:कडे ठेऊन घेतल्याने नाशिकच्या जागेवर राष्ट्रवादी दावा करत आहे. कारण, साताऱ्याची जागा सध्या राष्ट्रवादीकडे होती. मात्र, तिथे उदयनराजेंना उमेदवारी जाहीर करण्यात आल्याने साताऱ्याचा पेच सुटला आहे. आता, नाशिकच्या (Nashik Loksabha) उमेदवारीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. नाशिकमधून शिवसेना शिंदे गटाचे खासदार हेमंत गोडसे (Hemant Godase) आग्रही आहेत. त्यातच, आज हेमंत गोडसे आणि मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांची भेट झाली. त्यावेळी, भुजबळांनी उमेदवारी जाहीर न होण्यावरुन संताप व्यक्त केल्याचं दिसून येत आहे.  


श्रीराम नवमीनिमित्त नाशिकच्या काळाराम मंदिरात महायुती व महाविकास आघाडीचे दोन्ही इच्छुक उमेदवार दर्शनासाठी आले होते. यावेळी, दोघांची भेट झाल्यानंतर उमेदवारीवरुन स्थानिकांमध्ये चर्चा सुरू झाली आहे.सगळ्यांना सुखी ठेवा, मंदिरातून आशीर्वादचा हार घेऊन आलोय. प्रभू राम आणि देव निवडणुकीत येणार नाहीत. हेमंत गोडसे माझे मित्र आहेत. मी पण अनेकवेळा येथील मंदिरात आलो, आज राम नवमीनिमित्त दर्शन घेण्यासाठी आलो असता, ते पण मंदिरात आले होते. त्यावेळी, मी त्यांना शुभेच्छा दिल्या, असे भुजबळ यांनी म्हटले. 


मी निवडणुकानिमित्ताने चंद्रपूरमध्ये गेलो होतो आणि तेथील उमेदवारासाठी प्रचार करून आलो, असे सांगत नाशिकच्या उमेदवारीही भुजबळ यांनी भाष्य केलं. नाशिकसाठी ज्यांना उमेदवारी द्यायची असेल त्यांना द्या, पण 20 मे च्या आधी निर्णय घ्या. कारण, 20 मे चा मुहुर्त आहे, त्यामुळे त्या आधी निर्णय झाला तर बर होईल, अशा शब्दात भुजबळांनी संताप व्यक्त केला.  तसेच कुठल्याही पक्षाला नाशिकची जागा सोडा, पण 20 मे च्या आधी सोडा, असेही संतापजनक विधान भुजबळ यांनी केले. त्यामुळे, भुजबळांनी अप्रत्यक्षपणे महायुतीमधील वरिष्ठ नेत्यांनाच डेडलाईन दिल्याचं मंदिर दौऱ्यावेळी दिसून आलं.


हळू हळू आमच्या जागा वाढतील 


एबीपी माझा  सी व्होटरच्या सर्वेक्षणात नाशिक मतदारसंघातील जागेवर महाविकास आघाडीच्या उमेदवाराचं पारडं जड असल्याचं दिसून आलं. त्याच अनुषंगाने भुजबळ यांना प्रश्न विचारला असता. ही सुरवात आहे, हळू हळू सर्व्हेत आमच्या जागा वाढतील. आता जरी असे चित्र असले तरी परिस्थिती बदलेल, असे भुजबळ यांनी म्हटले. तसेच, महाराष्ट्रात व नाशिकमध्ये अजून नरेंद्र मोदी आणि इतर नेत्यांच्या सभा होणार आहेत, अशी माहितीही त्यांनी दिली. 


नाशिकच्या जागेवरुन रस्सीखेच


दरम्यान, नाशिकच्या जागेवरुन राष्ट्रवादी आणि शिवसेना शिंदे गटात रस्सीखेच सुरू आहे. मात्र, या जागेवर भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनाच तोडगा काढायचा असल्याने महायुतीतील वरिष्ठ नेते नेमकं काय निर्णय घेतील, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राष्ट्रवादीला ही जागा मिळाल्यास या जागेवर छगन भुजबळ निवडणूक लढवणार आहेत. विशेष म्हणजे भुजबळांनी काही दिवसांपूर्वी कर्जाची रक्कम फेडण्यास सुरुवात केल्याचेही वृत्त माध्यमांत झळकले होते. तर, हेमंत गोडसेही विद्यमान खासदार असल्याने या जागेसाठी आग्रही आहेत. त्यांनीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेऊन जागेवरील आपला दावा कायम असल्याचे म्हटले आहे.   


कार नाहीच, 16 तोळे सोने, 92 लाखांची संपत्ती; राम सातपुतेंच्या प्रतिज्ञापत्रात नेमकं काय काय?