Nagpur News नागपूर : राष्ट्रवादी काँग्रेस  अजित पवार(Ajit Pawar) गटाच्या पक्षाच्या मेळाव्यात मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी आज बोलताना ओबीसी आरक्षणाच्या सर्वपक्षीय बैठकीला विरोधक उपस्थित राहिले नाहीत, त्यावरून शरद पवारांवर गंभीर आरोप करत हल्लाबोल केला आहे. शरद पवारांमुळे (Sharad Pawar) विरोधकांनी आरक्षणाच्या बैठकीवर बहिष्कार टाकल्याचा आरोप भुजबळांनी केलाय. या वरून आता राज्याचे राजकारण तापले असून महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून देखील छगन भुजबळांवर आता टीकेची झोड उठताना दिसत आहे. त्यात आता काँग्रेस नेते  आणि राज्याचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी चक्क मंत्री छगन भुजबळांच्या नार्को टेस्टची मागणी केली आहे.


आपल्या पापाचे वाटेकरी करण्यासाठी महायुतीची चाल  


खरंतर सत्ताधाऱ्यांनी मराठा ओबीसी हा वाद निर्माण केला आहे. मुख्यमंत्री बैठका घेतात, मराठा समाजाला गुलाल उधळायला लावून त्यांची फसवणूक करतात. दोन्ही समाजाला कसं नाचवता येईल आणि केवळ आपली राजकीय पोळी कशी शेकता येईल, हेच काम त्यांनी केलंय. मात्र याचं हे पितळ आता उघडं झाले आहे. उपोषण स्थगित करते वेळी काय मसुदा तयार करण्यात आला, हेच आम्हाला माहित नाही. त्यावेळी विरोधकांना विश्वासात घेतल्या गेलं नाही. आता मात्र गले मे हड्डी लटक गई तेव्हा विरोधकाची आठवण सुरू झालीय. आपल्या पापाचे वाटेकरी करण्यासाठी महायुतीच्या लोकांची ही चाल आहे.  हे आमच्या लक्षात आली म्हणून  ते आता ट्रॅप झाले असल्याची टीका विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.


छगन भुजबळ कायम आपल्या सोयीचं राजकारण करतात


छगन भुजबळ नेहमी आपल्या सोयीचं राजकारण करतात. त्यामुळे हे नेमकं तपासलं तर भुजबळ कुणासोबत आहे आणि ते बोलतात कुणाच्या इशाऱ्याने  बोलतात हे कळेल. त्यामुळे एकदा त्यांची  नार्को टेस्ट केली पाहिजे,  असं मला वाटतं. जेणेकरून ते कोणाच्या इशारावर बोलत आहे हे स्पष्ट होईल, अशी बोचरी टीकाही वडेट्टीवार यांनी केली आहे.


आमच्याच पक्षातील असलेली घाण आमच्या लक्षात आली


पक्षात ज्यांनी गद्दारी केली त्यांच्यावर नक्कीच कारवाई होणार. मागच्या वेळी काही नावे आमच्या कानावर आली होती. मात्र तेव्हा मी कारवाई केली नाही. परंतु आता आम्ही पूर्ण अलर्ट होतो. आम्ही काही रणनीती आखलीय, त्यामुळे आमच्याच पक्षातील असलेली घाण आमच्या लक्षात आलीय. त्याचा प्रस्ताव आम्ही कारवाईसाठी वरिष्ठाकडे पाठवला आहे. त्यामुळे लवकरच त्यावर कारवाई होईल, असा विश्वासही वडेट्टीवार यांनी बोलताना व्यक्त केला आहे.


इतर महत्वाच्या बातम्या