Delhi Chief Minister Arvind Kejriwal Released Video: नवी दिल्ली : दिल्लीचे (Delhi) मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) 2 जून रोजी आत्मसमर्पण करणार आहेत. त्यापूर्वी त्यांनी एक व्हिडीओ जारी करून जनतेशी संवाद साधला आहे. "मी कुठे असीन, आत किंवा बाहेर, दिल्लीचं काम थांबणार नाही.", असं व्हिडीओमध्ये बोलताना अरविंद केजरीवाल म्हणाले आहेत. तसेच, हुकूमशाहीपासून देशाला वाचवण्यासाठी जेलमध्ये जातोय, असंही केजरीवाल यावेळी म्हणाले आहेत. 

Continues below advertisement


दिल्लीचे मुख्यमंत्र अरविंद केजरीवाल पुढे बोलताना म्हणाले की, "मला सर्वोच्च न्यायालयात प्रचारासाठी 21 दिवसांची परवानगी देण्यात आली होती. उद्या 21 दिवस पूर्ण होत आहेत. मला परवा आत्मसमर्पण करावं लागेल. मी परवा तुरुंगात जाईन. या वेळी हे लोक मला किती दिवस तुरुंगात ठेवतील माहीत नाही, पण माझी एक गोष्ट ऐका की, देशाला हुकूमशाहीपासून वाचवण्यासाठी मी तुरुंगात जाणार आहे."


तुरुंगात त्यांनी माझा छळ केलाय : अरविंद केजरीवाल 


"त्यांनी मला अनेकदा तोडण्याचा प्रयत्न केला, मला झुकवण्याचा प्रयत्न केला. पण मी झुकलो झालो नाही. मी तुरुंगात असतानाही त्यांनी माझा अनेक प्रकारे छळ केला. त्यांनी माझी औषधं बंद केली. मी 30 वर्षांपासून गंभीर मधुमेहाचा रुग्ण आहे. मी दिवसातून चार वेळा इन्सुलिन इंजेक्शन घेतो. त्यांनी माझं इंजेक्शन बरेच दिवस बंद केलं. त्यामुळे शुगरमुळे गंभीर आजार होण्याचा धोका बळावला आहे, पण तरिसुद्धा मी लढणार आहे.", असं अरविंद केजरीवाल म्हणाले आहेत. 


कदाचित यावेळी ते माझ्यावर आणखी अत्याचार करतील, पण मी झुकणार नाही : अरविंद केजरीवाल 


दिल्लीचे मुख्यमंत्री बोलताना म्हणाले की, "मी 50 दिवस तुरुंगात राहिलो आणि या 50 दिवसांमध्ये माझं वजन 6 किलोनं कमी झालं. मी तुरुंगात गेलो, तेव्हा माझं वजन 70 किलो होतं. आज 64 किलो आहे. तुरुंगातून सुटल्यानंतरही माझं वजन वाढत नाही. शरीरात काही मोठा आजार होऊ शकतो, अनेक तपासण्या कराव्या लागतील, असं डॉक्टर सांगत आहेत. माझ्या लघवीत केटोनची पातळीही खूप वाढली आहे. शरण येण्यासाठी मी दुपारी 3 वाजता माझ्या घरातून बाहेर पडेन. कदाचित यावेळी ते माझ्यावर आणखी अत्याचार करतील. पण मी झुकणार नाही."


"स्वतःची काळजी घ्या. तुरुंगात मला तुमची खूप काळजी लागून राहाते. तुम्ही खुश असाल तर तुमचे केजरीवालही खुश राहतील. अर्थात मी तुमच्यामध्ये नसेन, पण काळजी करू नका. तुमची सर्व कामं चालू ठेवतील. मी कुठेही असो, आत असो की बाहेर, दिल्लीचं काम थांबणार नाही. तुमची मोफत वीज, मोहल्ला क्लिनिक, हॉस्पिटल, मोफत औषधं, उपचार, महिलांसाठी मोफत बस, प्रवास, 24 तास वीज आणि इतर सर्व कामं सुरूच राहतील.", असं अरविंद केजरीवाल म्हणाले आहेत. 


आत्मसमर्पण करण्यापूर्वी केजरीवाल यांनी मोठी घोषणा केली आणि म्हणाले, "परत आल्यानंतर मी प्रत्येक आई आणि बहिणीला दरमहा हजार रुपये देण्यासही सुरुवात करेन. तुमच्या कुटुंबाचा मुलगा म्हणून मी नेहमीच माझं कर्तव्य पार पाडले आहे. आज मी माझ्या कुटुंबाकडून  काहीतरी मागत आहे. माझे आई-वडील खूप वृद्ध आहेत. माझी आई खूप आजारी असते. तुरुंगात त्यांची मला खूप काळजी वाटते. माझ्या मागून माझ्या 6 पालकांची काळजी घ्या. त्यांच्यासाठी प्रार्थना करा. देवाला प्रार्थना करतो. प्रार्थनेत मोठी शक्ती आहे. जर तुम्ही माझ्या आईसाठी दररोज प्रार्थना केली तर ती नक्कीच निरोगी राहील."